कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मल्लिकार्जुन खर्गेंचे ते राज्य आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे भाजपाने निजदचे आमदार फोडून कुमारस्वामी सरकार पाडत सत्ता बळकावली होती. यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार आहे. अशातच काँग्रेसने शनिवारी १२४ उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणा येथून, तर चाणक्य म्हणून नाव असलेले डी के शिवकुमार कनकपुरा येथून निवडणूक लढविणार आहेत. या यादीमध्ये खर्गेंचा मुलगा प्रियांक यांचेही नाव आहे. बाबलेश्वरमधून एमबी पाटील, गांधीनगर येथून दिनेश गुंडुराव तसेच भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आलेले एमएलसी पुत्तन्ना यांना राजाजीनगर येथून तिकीट देण्यात आले आहे.
ही आहे यादी...
कर्नाटकात सध्या भाजपाचे सरकार आहे. त्यापूर्वी काँग्रेस आणि निजदचे सरकार होते. हे सरकार दीड वर्ष होत नाहीत तोच भाजपाने आमदार फोडून पाडले होते. त्यापूर्वी काँग्रेसचे एकहाती सरकार होते. परंतू सिद्धरामय्या सरकारला बहुमत मिळाले नव्हते. यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेसने सत्ता राखली होती. परंतू, दीड-दोन वर्षातच कुमारस्वामी सरकार अंतर्गत बंडाळीमुळे कोसळले आणि भाजपा सत्तेवर आली होती.