कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपामध्ये काहीच आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, आज कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बडे नेते लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने लक्ष्मण सावदी हे नाराज होते. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी भाजपाकडून मिळालेली आमकारकीही सोडली होती.
सावदी यांनी कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी.के. शिवकुमार आणि काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांची भेट घेतल्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. लक्ष्मण सावदी हे भाजपावर एवढे नाराज होते की. त्यांनी आपल्या वक्तव्यामधून सांगितले की, आता माझा भाजपाशी काहीही संबंध नाही आहे. जर मी मेलो तर माझा मृतदेहसुद्धा भाजपा कार्यालयासमोरून नेऊ नये.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लक्ष्मण सावदी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे आपण दु:खी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण सावदी हे राजकीय भविष्यासाठी काँग्रेसमध्ये गेले आहेत. काँग्रेसकडे ६० हून अधिक मतदारसंघामध्ये लढण्यासाठी उमेदवार नाही आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यात येत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपा बहुमताने विजयी होईल, असा दावा बोम्मई यांनी केला.