बंगळुरू : भाजपला सोडचिठ्ठी देणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सकाळी ते बंगळुरू येथील काँग्रेस कार्यालयात पोहोचले आणि पत्रकार परिषदेला हजेरी लावली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.
शेट्टार म्हणाले, ‘पक्षाचा ज्येष्ठ नेता असल्याने मला तिकीट मिळेल, असे वाटले होते; पण तसे न झाल्याने मला धक्का बसला. याबाबत माझ्याशी कोणीही बोलले नाही किंवा त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. मला कोणते पद दिले जाईल, याचेही आश्वासन देण्यात आले नाही. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी शेट्टार यांना फॉर्म बी दिला. शेट्टार यांच्या आगमनानंतर काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या म्हणाले की, काँग्रेस राज्यात १५० हून अधिक जागा जिंकेल. भाजप पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळत आहे, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला.
बोम्मई यांचा राहुल गांधींवर पलटवारकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सोमवारी राहुल गांधी यांच्या ४० टक्के कमिशनचे सरकार असल्याच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत म्हटले की, आपण राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान पाठवलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपपत्रावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यांच्यावरच ४० टक्के कमिशनचे आरोपपत्र आहे.
‘भाजप, आरएसएसचा लोकशाहीवर हल्ला’ n भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहेत आणि लोकशाहीवर हल्ला करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. n भालकी येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण पाठिंबा द्यावा आणि पक्षाला १५० जागा जिंकून द्याव्यात, असे आवाहन केले. n राज्यात काँग्रेसचे सरकार येताच काँग्रेसने दिलेली चार आश्वासने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले.
भाजपची १० उमेदवारांची तिसरी यादी जाहीरबंगळुरू/नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेला अवघे तीन दिवस शिल्लक असताना सत्ताधारी भाजपने सोमवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत १० नावे आहेत. शिवमोग्गा व मानवी या दोन जागा शिल्लक आहेत.
१५ लाख मिळाले का?पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, मोदींनी १५ लाख रुपयांचे आश्वासन दिले होते, तुम्हाला मिळाले का? काँग्रेस जी काही आश्वासने देईल, ती सरकार स्थापन होताच पूर्ण केली जातील. हुमानाबाद येथील सभेतही राहुल यांनी भाजपवर जोरदार टीका केली.