कर्नाटकमध्ये नाराजांनी चांगलाच भाव खाल्ला आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामधून उत्तर कर्नाटकातील भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथनीमधून तिकीट दिले आहे.
सवदी यांनी भाजपाने तिकीट न दिल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आज तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये ४३ मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेत. १२४ उमेदवारांची यादी काँग्रेसने २५ मार्चला जारी केली होती. यानंतर ४२ उमेदवारांची यादी ६ एप्रिलला जारी करण्यात आली होती.
भाजपाने देखील ११ विद्यमान आमदारांना घरी बसवून काँग्रेस, निजदमधून आलेल्या काही जणांना तिकीट दिले आहे. तर सत्ता हस्तगत करण्यासाठी ज्य़ा नेत्यांनी मदत केली त्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. यामुळेच सवदी नाराज झाले होते. काँग्रेसने शिमोगा ग्रामीणमधून श्रीनिवास करियाना तर शिमोगातून एच सी योगेश यांना उमेदवार केले आहेत. बळ्ळारीतून नारा भारत रेड्डी यांना तिकीट देण्यात आले आहे. चिकबळ्ळापूरमधून प्रदीप ईश्वर अय्यर आणि बंगळुरू दक्षिणमधून आरके रमेश यांना चिकीट देण्यात आले आहे.
काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार डीके शिवकुमार कनकापुरा आणि सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सिद्धरामय्या यांनी कोलारमधून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली होती. परंतू तिथून कोथुर्जी मंजुनाथ यांना उमेदवारी देण्य़ात आली आहे.
भाजपने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यानंतर 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. निजदने देखील खूप आधी म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ९३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. शुक्रवारी ५० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.