कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासांच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेसला बहुमताच्या आसपास जागा मिळतील, असे संकेत मजमोजणीमधून दिसत आहेत. दरम्यान, सत्ता येण्याची चाहूल लागताच काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या आणि ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी चुरस आहे. त्यामुळे संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी आधीच एक फॉर्म्युला तयार केला आहे.
काँग्रेसने कर्नाटकमध्ये विजयाची संधी असल्याचे संकेत मिळाल्यानंतर पुढील सत्तास्थापनेचा फॉर्म्युला तयार केला आहे. राज्यात माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना सुरुवातीपासून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर पहिली अडीच वर्षे सिद्धारामैय्या यांना मुख्यमंत्री बनवण्यात येईल. त्यानंतर उर्वरित अडीच वर्षे डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाईल.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल जवळपास स्पष्ट झाले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार एकूण २२१ जागांचे कल समोर आले आहेत. त्यात काँग्रेस ११२, भाजपा ७४, जेडीएस ३० आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत.