बेळगाव - कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांचे निकाल आता हाती आलेले आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून राज्यात मतमोजणीला सुरूवात झाली. त्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली तर भाजपा पिछाडीवर राहिली. कर्नाटकातील निकालाच्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला आघाडी मिळेल अशी शक्यता वर्तवली होती. त्याचप्रमाणे निकाल हाती येत आहे. काँग्रेस ११५ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.
या निवडणुकीत निपाणी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील आघाडीवर आहेत. शरद पवारांनी निपाणी इथं सभा घेत पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले होते. शरद पवारांची ही सभा निपाणीत फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येते. निपाणी मतदारसंघात शशिकला जोल्ले या पिछाडीवर आहेत. सकाळी ११.३० पर्यंत राष्ट्रवादीचे उत्तम पाटील यांना २६०६३ मते मिळाली असून भाजपाच्या शशिकला यांना २५,०९७ मते मिळाली आहेत. निपाणीत काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांना १७,४९२ मते मिळाली आहेत. सध्या या मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
निपाणीत देवेंद्र फडणवीसांनी केली होती पवारांवर टीकानिपाणी मतदारसंघातील भाजपा उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली होती. सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभेत बोलताना फडणवीस म्हणाले होते की, इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो अशी टीका फडणवीसांनी केली होती.