- हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभेतील खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या नावाचा कर्नाटक विधानसभा निवडणुकांमधील त्या पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही; मात्र काँग्रेसने अभिनेत्री व माजी खासदार दिव्या स्पंदना यांना कर्नाटकातील प्रचारासाठी बोलाविल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कर्नाटकमध्ये येत्या १० मे रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत.
या राज्यात भाजपतर्फे ४० स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे. भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे निकटवर्तीय असलेल्या खासदार तेजस्वी सूर्या यांचे नाव प्रचारकांच्या यादीत नसल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तेजस्वी सूर्या यांना विमान दरवाजा प्रकरण भोवले?भाजपच्या अन्य एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, चेन्नईवरून तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याप्रकरणी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी माफी मागितली होती. तेजस्वी सूर्या यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट केले असते तर विरोधकांकडून भाजपवर टीका होण्याची शक्यता होती. त्यामुळे या यादीत त्यांचे नाव नाही.
जयराम रमेश यांच्याशी झाले होते मतभेदकाँग्रेसने माजी खासदार व अभिनेत्री दिव्या स्पंदना (त्यांचे रुपेरी पडद्यावरील नाव रम्या असे आहे.) यांचे नाव काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशावरून पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे कळते. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्याशी मतभेद झाल्याने दिव्या स्पंदना यांनी २०१९ साली काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.
नेते काय म्हणतात?यासंदर्भात भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, तेजस्वी सूर्या यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते ज्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, त्याच्या अख्यत्यारीत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आणणे ही मोठी जबाबदारी तेजस्वी सूर्या यांच्या खांद्यावर आहेच. त्याचबरोबर ते कर्नाटकमधील ५० विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराला जाणार आहेत.
मोदींच्या २० ठिकाणी सभाबंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात २० ठिकाणी प्रचार करतील, असे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी दिले. पंतप्रधानांच्या प्रचार मोहिमेला अंतिम रूप देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते. बहुतांश ठिकाणी ते मेळावा किंवा जाहीर सभेला संबोधित करतील. तथापि, काही ठिकाणी त्यांचा रोड शोदेखील होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अमित शाह यांचा आज रोड शो केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे शुक्रवारी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर येत असून, पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. ते शुक्रवारी दुपारी बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील १८ व्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांचे जन्मस्थान असलेल्या देवनहल्ली शहरात रोड शो करणार आहेत.
‘लिंगायत मुख्यमंत्री’ मोहीम सत्ताधारी पक्ष ‘लिंगायतविरोधी’ असल्याच्या काँग्रेसच्या आरोपातील हवा काढण्यासाठी भाजपच्या लिंगायत नेत्यांचा ‘लिंगायत मुख्यमंत्री’ मोहीम सुरू करण्याचा मानस आहे. ज्येष्ठ लिंगायत नेते जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांनी तिकीट नाकारल्यानंतर भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस तेव्हापासून भाजपकडून लिंगायतांवर ‘अन्याय’ होत असल्याचा आरोप करत आहे.
ईश्वरप्पांच्या मुलाला तिकीट नाकारलेnकर्नाटकातील सत्ताधारी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली. या यादीत शिवमोग्गा व मानवी या दोन उर्वरित मतदारसंघांसाठीच्या उमेदवारांची नावे आहेत. nशिवमोग्गात पक्षाने विद्यमान आमदार व ज्येष्ठ भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा यांच्या कुटुंबाला तिकीट नाकारून चन्नाबसप्पा यांना ते दिले. ईश्वरप्पा यांनी अलीकडेच राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.