कर्नाटकात हा कसला पेच! काँग्रेसचा उमेदवार त्याच्या मतदारसंघातच प्रचार करू शकणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:51 IST2023-04-18T19:50:40+5:302023-04-18T19:51:31+5:30
कर्नाटकमध्ये निवडणूक पूर्व सर्व्हेंमुळे सत्तेचे बाशिंग बांधून घोड्यावर स्वार होण्यास तयार असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

कर्नाटकात हा कसला पेच! काँग्रेसचा उमेदवार त्याच्या मतदारसंघातच प्रचार करू शकणार नाही...
कर्नाटकमध्ये तिकिटे न मिळाल्याने भाजपमधील नाराजांनी काँग्रेसमध्ये उड्या मारल्याचे सत्र थांबत नाही तोच निवडणुकीचा दुसरा अंक सुरु झाला आहे. सर्व पक्षांचे उमेदवार आता अर्ज भरण्याची तयारी करत आहेत. तर अनेकांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. परंतू, काँग्रेसचा असा एक उमेदवार आहे, ज्याला त्याच्याच मतदारसंघात प्रचार करता येणार नाहीय. यामुळे मोठ्या पेचात काँग्रेस अडकली आहे, तर भाजपाचे नेते खुशीत दिसत आहेत.
कर्नाटकमध्ये निवडणूक पूर्व सर्व्हेंमुळे सत्तेचे बाशिंग बांधून घोड्यावर स्वार होण्यास तयार असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धारवाडमधून काँग्रेसने विनय कुलकर्णी यांना उमेदवारी दिली होती. परंतू, न्यायालयाने त्यांना भाजपा जिल्हा पंचायत नेत्याच्या हत्येप्रकरणी धारवाडमध्ये येण्यासच मनाई केली आहे. यामुळे उमेदवारी मिळूनही विनय कुलकर्णी हे प्रचार करू शकणार नाहीएत. कुलकर्णी यांच्यावर योगेश गौड़ा यांच्या हत्येचा आरोप आहे.
कर्नाटकच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलकर्णी त्यांच्याच मतदारसंघात प्रवेश करू शकणार नाहीएत. कुलकर्णी यांनी देखील मी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करत असून धारवाड बाहेरूनच काम करेन असे म्हटले आहे. कुलकर्णी हे माजी मंत्री आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्यावर न्यायालयाने धारवाडमध्ये येण्यास प्रतिबंध लावला होता. यावर त्यांनी मी काय मोठा दहशतवादी आहे का, की मला माझ्याच जिल्ह्यातून बाहेर काढण्यात आले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. कुलकर्णी यांनी जिल्ह्यात प्रवेश मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. परंतू, न्यायमूर्तींनी ती फेटाळली आहे.
15 जून 2016 चे हे प्रकरण आहे. सिद्धरामय्या सरकारने यावर कारवाई केली नव्हती. भाजपाने गेल्या निवडणुकीत याचा मुद्दा बनवून सत्तेत आल्यावर तुरुंगात धाडण्याचे म्हटले होते. सत्तेत आल्यावर भाजपाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले. या प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. परंतू, जामीन देताना कोर्टाने धारवाडमध्ये प्रवेश करणार नसाल तरच मंजूर करतो असे म्हटले होते. आता ही अटच कुलकर्णींना अडचणीची ठरली आहे.