बंगळुरू: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास नक्की पंतप्रधान होईन, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलंय. 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास पंतप्रधान होणार का, असा प्रश्न कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देत राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान पदाबद्दल भाष्य केलं.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकात असलेल्या राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. 'मोदी आणि भाजपाला मुख्यमंत्रीपदासाठी निष्कलंक चेहरा मिळाला नाही का?', असा प्रश्न उपस्थित करत राहुल यांनी येडियुरप्पांवर निशाणा साधला. याशिवाय रेड्डी बंधू यांनी दिलेल्या उमेदवारीहून राहुल गांधी भाजपा नेतृत्वार बरसले. 'तब्बल 35 हजार कोटी रुपयांची लूट करणाऱ्या रेड्डी बंधूंना भाजपानं उमेदवारी का दिली?', असा सवाल करत राहुल गांधी यांनी भाजपाच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.