बेंगळुरु- कर्नाटकचे मावळत्या विधानसभेतील मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. काँग्रेससाठी कर्नाटक हे एकमेव मोठे आणि महत्त्वाचे राज्य शिल्लक राहिले होते. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्यावर मोठी जबाबदारी पडली होती. सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरीमधून पराभव होणे काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक आहे. काँग्रेसने ही संपूर्ण निवडणूक सिद्धरामय्या यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दिला पणाला लावून निवडणूक लढविली होती.
मुख्यमंत्री पदावरती असूनही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सिद्धरामय्या कर्नाटकातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. यापुर्वी माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी 1985 व 1989 साली दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. होळेनरसिंहपूर आणि सतनूर या दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरला होता. 1985 साली ते दोन्ही जागांवर विजयी झाले आणि 1989 साली दोन्ही जागांवर ते पराभूत झाले. मात्र दोन्ही वेळेस ते मुख्यमंत्री नव्हते.
1999 ते 2004 असे स्थिर सरकार देणाऱ्या आणि चांगले प्रशासक म्हणवल्या जाणाऱ्या एस. एम. कृष्णा यांना 2004 साली मतदारसंघ बदलावा लागला होता. त्यांनी मद्दूरऐवजी चामराजपेटमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेस जनता दल सेक्युलरचे नेते आणि त्या पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एच.डी. कुमारस्वामीही दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. रमणगारा आणि चन्नपटट्ण अशा दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरलेले होते.
देवराज अर्स यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहाण्याची संधी सिद्धरामय्या यांना मिळाली तरिही त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांनी आपल्या वरुणा मतदारसंघातून त्यांचा मुलगा यतींद्र याला संधी दिली आणि ते शेजारील चामुंडेश्वरी विधानसभा मतादरसंघात गेले आहेत. या मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून गेले आणि दोन वेळा पराभूत झाले आहेत. 2006 साली त्यांनी येथून शेवटची निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना फक्त 257 मते मिळाली होती. तसेच त्यांचे एकेकाळचे मित्र जीटी देवेगौडा जे वक्कलिंग समाजाची मते मिळवण्यासाठी मदत करायचे तसेच श्रीनिवास प्रसाद दलित मतासांठी मदत करायचे ते आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. बदामीमध्ये सिद्धरामय्या यांच्या कुरुबा समाजाची मते असली तरी लिंगायत आणि नायक समाजाची तेथे जवळपास 50 टक्के मते आहेत. त्यामुळे भाजपाने त्यांच्याविरोधात नायक समाजाचे श्रीरामलू यांना उभे केले होते.