बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला. राहुल गांधी यांनी भाजपा भ्रष्टाचाराचं समर्थन करत असल्याचा आरोप करत म्हटले की, भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगवास भोगवा लागला. यावरुन त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच दलित-महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनाबाबतही राहुल गांधी यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दलितांचे प्रश्न उचलून का धरत नाहीत, असा प्रश्न यावेळी राहुल गांधी यांनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी दलितांच्या प्रश्नांबाबत मौन बाळगतात, त्यामुळे आम्हाला बोलावे लागते, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्लाबोल चढवला आहे. ''आम्ही वारंवार सांगत आहोत, दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, त्यांना मारहाण केली जात आहे. रोहित वेमुल मृत्यू प्रकरणावर पंतप्रधानांनी मौन का बाळगलं? रोहितला मारण्यात आलं का? शिवाय, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात काँग्रेसनं का बोलू नये?, असे अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपाला टार्गेट केले.
''मोदी राफेल व्यवहाराला शानदार म्हणतात. मी पण तेच म्हणतो हा व्यवहार चांगलाच आहे. पण मोदींच्या मित्रांसाठी तो व्यवहार चांगला आहे. शिवाय, आम्ही कर्नाटकसाठी मनरेगाकडून ३५ हजार कोटी रूपये दिले होते. भाजपाच्या रेड्डी बंधुंनी इतक्याच पैशांचा घोटाळा केला. भाजपाने अशा लोकांना उमेदवारी दिली आहे'', असा टोलादेखील त्यांनी हाणला आहे.
राहुल गांधी झाले भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून वैयक्तिक हल्ले होत असल्याचे सांगताना राहुल यावेळी थोडे भावूकदेखील झाले होते. ते म्हणाले की, 'या निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपानं शिष्टाचार पाळला नाही. त्यांनी व्यक्तिगत टीका करण्यावर अधिक भर दिला. माझी आई इटलीची आहे. पण या देशासाठी योगदान दिले आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या तोंडी अशी भाषा शोभून दिसत नाही.'
राहुल गांधी हे तर अहंकारी नेते - नरेंद्र मोदी
काँग्रेसला सहा रोग लागले असून तो पक्ष जिथे जातो, तिथे या रोगांची लागण होते, अशी टीका करतानाच, स्वत: पंतप्रधान होण्यास आपण तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगणे हा त्यांच्या अहंकाराचा पुरावा आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.काँग्रेस कल्चर (संस्कृती), कम्युनलिझम (सांप्रदायिकता), कास्टिझम (जातियवाद), करप्शन (भ्रष्टाचार), क्रिमिनलायझेशन (गुन्हेगारीकरण), व काँट्रॅक्टर (कंत्राटदारी) अशा सहा ‘सी’ ने कर्नाटकचे भवितव्य बिघडवून टाकले आहे, असे नरेंद्र मोदी कोलारमधील बांगरपेट येथे जाहीर सभेत म्हणाले. कोणीतरी मी पंतप्रधान होईन, अशी घोषणा केली. स्वत:ला अशा प्रकारे पंतप्रधान म्हणून घोषित करणे हा अहंकाराचा पुरावा आहे. एकीकडे भाजपाला हटवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत असताना, त्यातील एका पक्षाचा नेता इतरांना विचारात न घेताच, स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करतो, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. मोदी यांनी आज राज्यात तीन सभा घेतल्या. चिकमंगळूरच्या सभेत त्यांनी बनावट ओळखपत्रांचा उल्लेख करून, त्याबद्दल काँग्रेसवर टीका केली.