बंगळुरू- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 12 मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कर्नाटकात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेसनं सभांचा धडाका लावला असून, राहुल गांधी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळताना पाहायला मिळतायत. तर दुसरीकडे भाजपाकडून अमित शाहा प्रचारात सक्रिय झाले आहेत. परंतु काँग्रेसनं भाजपापेक्षा जास्त धसका जनता दल(सेक्युलर)चा घेतला आहे.गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी टुमकुर येथे रोड शो करत होते. त्याच वेळी 69 किलोमीटरवर एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी कुमारस्वामी जनता दलाचा प्रचार करत होते. कुमारस्वामी एकटेच होते, त्यांच्याबरोबर जनता दल(सेक्युलर)चा कोणताही नेता नव्हता. तरीसुद्धा राहुल गांधींच्या रोड शोला असलेल्या माणसांहून जास्त माणसे त्यांच्या प्रचाराला होती. त्यामुळे पुन्हा सत्ता स्थापनेकडे डोळे लावून बसलेल्या काँग्रेसच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. काँग्रेस किंवा भाजपासारख्या कुमारस्वामी यांच्या प्रचारसभा हायटेक नसतात. तरीही त्याच्या प्रचारसभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात कुमारस्वामी यांना मोठा जनाधार असल्याचंही आता स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात कुमारस्वामी असे नेते आहेत की ते एकट्यानं लढून सत्ता मिळवू शकतात. कोणत्याही इतर पक्षांचा पाठिंबा नसताना त्यांनी प्रचारसभांचा सपाटा लावला आहे.कोण आहेत कुमारस्वामी ?माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे कुमारस्वामी हे तिसरे पुत्र आहेत. कर्नाटकाच्या राजकारणात त्यांना 'कुमारअण्णा' नावानंही ओळखलं जातं. 2006मध्ये कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस-जनता दलाचं सरकार उलथवून लावत भाजपाच्या पाठिंब्यावर ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. 20 महिने त्यांनी भाजपाबरोबर युती करून सत्ता उपभोगली. गेल्या 40 वर्षांमधील कर्नाटकातले सर्वात चांगले मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांचा लौकिक झाला. दोन महिन्यांपूर्वी भाजपा आणि काँग्रेसला आपल्याला टक्कर देण्यासाठी जनता दल(सेक्युलर) स्पर्धेत नसल्याचं वाटत होतं. परंतु परिस्थिती बदलत असल्याचंही पाहून काँग्रेसला धक्का बसला आहे. एचडी कुमारस्वामी कर्नाटकात पुन्हा जनता दलाची सत्ता आणण्यासाठी मेहनत करत असून, मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतायत. जुन्या म्हैसूर भागात जनता दला(एस)चा मोठा प्रभाव आहे. काँग्रेस आणि जनता दल(सेक्युलर)मध्ये जवळपास 75 विधानसभांच्या जागांवर सरळ सरळ लढत आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. म्हैसूर, हासान, मांड्या, टुमकूर आणि बंगळुरूतल्या बाहेरच्या भागातही कुमारस्वामी यांनी मोठ्या प्रमाणात रॅली काढल्या आहेत. त्यामुळे कुमारस्वामी पुन्हा सत्ता मिळवतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Karnataka Assembly Election 2018: देवेगौडांच्या मुलानं उडवली काँग्रेसची झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 6:30 PM