Karnataka Assembly Elections 2018 : नरेंद्र मोदी-राहुल गांधी यांचे परस्परांवर जोरदार हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:57 AM2018-05-06T01:57:28+5:302018-05-06T01:57:28+5:30
कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण भलतेच तापले असून, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस जनतेला मूर्ख बनवत आली असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी केला, तर कर्नाटकातील तुमच्याच पक्षातील मोस्ट वाँटेड उमेदवारांच्या नेत्यांबद्दल मोदी यांनी मौन सोडून बोलावे, असे तगडे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.
बंगळुरू : कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण भलतेच तापले असून, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस जनतेला मूर्ख बनवत आली असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी केला, तर कर्नाटकातील तुमच्याच पक्षातील मोस्ट वाँटेड उमेदवारांच्या नेत्यांबद्दल मोदी यांनी मौन सोडून बोलावे, असे तगडे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.
बुगळुरूजवळील टुमकूरच्या सभेत मोदी यांनी काँग्रेसने गरिबांसाठी आतापर्यंत काहीच केले नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस गरीब, गरीब, गरीब असा शंखनाद करीत आली, पण गरिबी दूर करण्यासाठी, गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या पक्षाने काहीच केले नाही. कर्नाटकातही काँग्रेस नेत्यांनी गरिबांच्या नावाखाली स्वत:चे खिसे भरण्याचे काम केले, असे ते म्हणाले.
पण राहुल गांधी यांनी भाजपाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व वादग्रस्त नेत्यांची नावे घेऊ न, पंतप्रधानांनी तुरुंगात जाऊ न आलेल्या येडियुरप्पांविषयी आणि रेड्डी बंधू यांच्याविषयी बोलावे, असे आव्हान त्यांना दिले. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ क्लिप जारी केली असून, त्यात अशा भाजपा नेत्यांचा थेट नावाने उल्लेख केला आहे. त्यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल मोदी यांनी पाच मिनिटे तरी बोलावे, असा आग्रह राहुल यांनी धरला आहे.
रेड्डी बंधूंच्या तब्बल ३५ हजार कोटीच्या खाण घोटाळ्यावर तुम्ही पांघरूण टाकले, असे राहुल गांधी यांनी व्हिडिओत ऐकविले आहे. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी तुम्ही कागद वापरला तरी चालेल, असा टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला आहे. (वृत्तसंस्था)
क्लिपमध्ये वादग्रस्त नेत्यांची नावे
भ्रष्टाचार, फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे असे गंभीर गुन्हे असलेल्या येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार केले असल्याचा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधी यांनी या क्लिपमध्ये बी. श्रीरामुलू, जी. सोमशेखर रेड्डी, टी. एच. सुरेश बाबू, के. सुब्रमण्यम नायडू, सी. टी. रवी, मुरुगेश निराणी, एस एन कृष्णय्या शेट्टी मालूर, के. शिवगौडा नाईक, आर. अशोक व शोभा करंदलाजे या गुन्हे दाखल असलेल्या भाजपाच्या नेत्यांची व उमेदवारी नावे घेतली आहेत.
निवडणुकांनंतर काँग्रेस पीपीपी : मोदी
गदगमधील सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, कर्नाटकमधील पराभवानंतर काँग्रेस केवळ पीपीपी म्हणजेच पंजाब, पुडुच्चेरी व परिवार यांच्यापुरतीच शिल्लक राहील. कर्नाटकातून काँग्रेस नेत्यांना दिल्लीत मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असून, तो कायम राहावा, यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहेत, असे ते म्हणाले.
भाजपाचा तो कार्यकर्ता जिवंतच
काँग्रेसच्या काळात कर्नाटकातील भाजपाचे २३ कार्यकर्ते शहीद झाले, असे म्हणत, काँग्रेसवर जिहादी असल्याचा आरोप भाजपाने केला होता. पंतप्रधान मोदी यांनीही २३ जणांचा सभेत उल्लेख केला होता. त्या २३ जणांच्या यादीत पहिले नाव होते, अशोक पुजारी यांचे.
तो २0 सप्टेंबर २0१५ रोजी हुतात्मा झाला, असे भाजपा नेत्याने म्हटले होते, पण अशोक पुजारी अद्याप जिवंतच आहेतं, असे उघड झाले आहे. त्यानंतर, भाजपाच्या उडुपीतील खा. शोभा करंदलाजे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
मात्र, विश्व हिंदू परिषदेचे नेते जगदीश शेणवाई म्हणाले की, भाजपाने त्यांचे नाव दिले असेल, तर ते खरेच असेल. भाजपा खोटी माहिती कधीच देणार नाही.