कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: महिलांनो आम्हाला फक्त तुमची मतं हवीत, तुम्ही नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:13 AM2018-04-30T11:13:22+5:302018-04-30T11:13:48+5:30
भाजपाने केवळ ६ व काँग्रेसने १५ महिलांना पक्षाचे तिकीट दिले आहे.
बंगळुरु- महिला सबलीकरण करु, निर्णय प्रक्रीयेत महिलांना स्थान हवे असे राजकीय पक्ष सांगत असले तरी त्यांचं प्रत्यक्ष वर्तन मात्र याच्या अगदीच उलट आहे. महिलांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी राजकीय पक्ष काहीच करत नसल्याचे कर्नाटक विधानसभेसाठी लढणाऱ्या उमेदवारांच्या यादीवरुन दिसते.
एकूण ३३७४ उमेदवारांमध्ये केवळ ७% उमेदवार महिला आहेत. भाजपाने केवळ ६ व काँग्रेसने १५ महिलांना पक्षाचे तिकीट दिले आहे. कर्नाटक विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी ४८% मतदार महिला आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा यात १३% इतकी वाढ झाली आहे. मात्र तरिही राजकीय पक्षांना महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे असे वाटत नाही. आपल्या पक्षातर्फे जास्तीत जास्त महिलांनी विधानसभेत जावे असे कोणत्याही पक्षाला मनापासून वाटत नसल्याचे उमेदवारांच्या आकडेवारीकडे पाहिल्यावर लक्षात येते.
महिलांना पक्षाचे तिकीट द्यायला मागे हटणारे पक्ष महिलांची मते मिळवण्यासाठी मात्र वाटेल ते करायला तयार आहेत. कर्नाटकात मतांसाठी स्वयंपाकाची भांडी, सोने, पैसे , तांब्याची भांडी, प्रेशर कुकर, साड्या अशा वस्तू वाटायला सुरुवात झाली आहे. निर्वाचन आयोगाने १.७६ कोटी रोख, १५ लाख किमतीच्या चांदीच्या वस्तू, २६८ तांब्याची भांडी या प्रचारकाळात जप्त केली आहेत, या सर्व वस्तू- पैसे लोकांमध्ये वाटण्यासाठी वापरले जात होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात १६.२८ कोटी रुपयांचे कुकर व साड्या जप्त करण्यात आल्या. बेंगरुळु येथील काँग्रेस उमेदवार एम. मुनिरत्न यांच्याविरोधात पक्षाचे चिन्ह व इतर माहिती छापलेल्या खोक्यांमधून साड्या, तवे व९६ कुकर वाटल्याचा आरोप ठेवत आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल झाली आहे.