नवी दिल्ली- आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटकात विजयी झालेल्या सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची संख्या 104 पर्यंत येऊन थांबली आहे. कर्नाटकात सत्ता स्थापनेपर्यंत भाजपा आला असला तरी जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस एकत्रित सरकार स्थापन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित भाजपाला विरोधी पक्षातही बसावे लागू शकते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच भारतीय जनता पार्टीच्या यशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाईल.2013 सालच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे कर्नाटकातील चेहरा म्हणून ओळखले जाणारे येडीयुरप्पा पक्षापासून दूर गेले होते. मात्र अल्पावधीतच भाजपाने त्यांना पुन्हा जवळ केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकात भाजपाला जागाही मिळाल्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गेल्या वर्षभरापासूनच निवडणुकीची तयारी सुरु केली होती. इंदिरा कँटिनसारख्या लोकप्रिय योजनाही लागू करण्यात आल्या होत्या. मात्र गुजरात निवडणुकीनंतर लगेचच भाजपाअध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लक्ष कर्नाटक निवडणुकी देण्यास सुरु केले. तसेच काँग्रेससाठी हे एकमेव मोठे राज्य शिल्लक राहिले असल्याने सिद्धरामय्या यांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे सिद्धरामय्या नरेंद्र मोदी यांना भाषणांमधून, ट्वीटरवरुन थेट आरोप करु लागले. कर्नाटकचे मुद्दे सोडून राष्ट्रीय मुद्द्यांवर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करु लागले. नरेंद्र मोदी यांनी या प्रत्येक आरोपाचे चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पंतप्रधानांनी दक्षिण कर्नाटकापासून किनारी प्रदेश ते थेट उत्तर कर्नाटकामध्ये विविध मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या. या सर्व सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता. मोठ्या काळानंतर म्हणजे देवराज अर्स यांच्यानंतंर सलग पाच वर्षांची टर्म पूर्ण करण्याची संधी आणि भाग्य सिद्धरामय्या यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या सरकारमधील उणिवा शोधून काढून प्रचार करणे नरेंद्र मोदी व भाजपासाठी विशेष महत्त्वाचे ठरणार होते. सिद्धरामय्या यांच्या सरकारमधील भ्रष्टाचारावरुन नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मिस्टर टेन पर्सेंट म्हणून उल्लेख करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे कर्नाटकातील त्यांच्या सरकारमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा वारंवार उल्लेखही भाषणात केला. सिद्धरामय्या यांनी दोन जागांवरुन लढण्याचा निर्णय घेतला तसेच आपल्या मुलालाही तिकीट दिल्यावर 2+1 फॉर्म्युला असाही शब्दप्रयोग मोदींनी केला.झंझावाती प्रचारसभा आणि काही दिवस पूर्णवेळ कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी वेळ दिल्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या संख्येत एवढी वाढ झाली असावी. दुसरीकडे काँग्रेसकडे मात्र प्रचारासाठी पूर्णतः सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांच्यावरच विसंबून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी केवळ एकच दिवस प्रचारासाठी दिला. कदाचित या सर्वाचे परिणाम सिद्धरामय्या यांना अखेरच्या काळात दिसू लागले त्यामुळेच दलित मुख्यमंत्री होणार असेल तर आपण पदाचा त्याग करायला तयार आहोत असे मत ते मांडू लागले. गुजरात प्रमाणे कर्नाटकचे यश मात्र भाजपाला नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनीच मिळाले हे मात्र आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
Karnataka Assembly elections 2018; काँग्रेसला पराभूत करण्यात पंतप्रधान मोदींचा मोठा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 6:08 PM