बंगळुरू - पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आधीच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी 95 टक्के आश्वासने आपल्या पक्षाने पूर्ण केली असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन देण्याचे दिलेले आश्वासन हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या, आणि पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधी म्हणाले, "गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाने जी आश्वासने दिली होती. त्यापैकी 95 आश्वासनांची आम्ही पूर्तता केली आहे. मात्र दुसरीकडे मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र अद्याप कुणालाही काही मिळालेले नाही." यावेळी राहुल गांधींनी राफेल करारावरून भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला केला. मोदींच्या मन की बात कार्यक्रमावरही राहुल गांधी यांनी निशाणा साधला, मी मन की बात करत नाही तर लोकांच्या मनाचे ऐकून काम करतो. आता भाजपाचा जाहीरनामा काही ठरावीक व्यक्ती आणि संघाच्या ध्येयधोरणांनुसार प्रसिद्ध होईल. तसेच भाजपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवन्ना यांना मानण्याचे नाटक करत आहे. पण प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचे पालन हा पक्ष करत नाही.
Karnataka Assembly Elections 2018 : राहुल गांधींनी प्रसिद्ध केला काँग्रेसचा जाहीरनामा, विद्यार्थ्यांना देणार मोफत स्मार्टफोन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 1:52 PM