नवी दिल्ली- कर्नाटक निवडणुकीचा तारीख जसजशी जवळ येते आहे तसतसा पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. कर्नाटकात निवडणुकीचं वातावरण असताना आत्तापर्यंत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १२० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं समोर येत आहे. सोनं, दारू आणि इतर साहित्याचा समावेश जप्त केलेल्या मुद्देमालात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भातील माहिती दिली आहे.
आत्तापर्यंत एकुण 67.27 कोटी रुपये रोकड, 23.36 कोटी रुपयांची पाच लाख लीटर दारू आणि 43.17 कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. इतकंच नाही, तर या कारवाईत आत्तापर्यंत एकुण 18.57 कोटी रुपये किंमतीचे प्रेशर कुकर, साड्या, शिलाई मशीन्स, गुटखा, लॅपटॉप आणि गाड्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जप्त केलेल्या 152.78 कोटी रक्कमेपैकी 32.54 कोटी रुपयांची रोकड पडताळणीनंतर सोडण्यात आल्याचं ते म्हणाले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून ते आत्तापर्यंत 39.80 लाख रुपयांचे इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदार होणार असून 15 मे रोजी निकाल आहे.