बेंगळुरू- सोमनहळ्ळी मल्लया कृष्णा हे नाव आहे एका यशस्वी प्रशासकाचं, कर्नाटकात एकेकाळी स्थीर सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्याचं, महाराष्ट्राच्या माजी राज्यपालांचं आणि भारताच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांचं. प्रदीर्घ कारकीर्द काँग्रेसमध्ये गेल्यावर गेल्यावर्षी वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी भाजपात प्रवेश केला. अनेक वर्षांनी ते परवा प्रचारसभेत दिसले पण त्यांच्याबरोबरचे सर्व समर्थक, नातलग पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आहेत.
भारतीय जनता पार्टीने काँग्रेस आणि विविध पक्षांमधील नाराज व ज्येष्ठ पण सध्याच्या राजकीय पटलावर कार्यरत असणाऱ्या नेत्यांसाठी दारं उघडली. यामध्ये भ्रष्टाचारासकट अनेक आरोपांना सामोरे गेलेले नेते होते, कित्येक नेत्यांना दस्तुरखुद्द भाजपानेच सळो की पळो करुन सोडले होते. या नेत्यांमध्ये सुखराम यांचाही समावेश होता. पण भाजपाने सुखराम यांनाही मुक्तद्वार दिले. नारायण दत्त तिवारी यांचे आशीर्वाद स्वीकारले. तसेच ज्यांच्याविरोधात सतत आगपाखड केली त्या एस. एम. कृष्णा यांनाही आपलेसे केले. आम्ही "विकास" करणाऱ्या पक्षाच्या बाजूने राहतो, असे सांगणारे कृष्णा आज मात्र चांगल्याच अडचणीत आहेत. मूळघरच्या काँग्रेसमधील कोणतीच माणसे बरोबर नाहीत, भाजपाला त्यांची फारशी गरज वाटत नाही आणि साथ न देणारी प्रकृती यामुळे ते स्वतःच तयार केलेल्या चक्रव्युहात अडकले आहेत.
गेल्या वर्षी ''हमे क्रिष्नाजी के अनुभव का लाभ होगा'', असे म्हणणाऱ्या अमित शाह यांच्या भाजपाच्या प्रचारसभेत परवा पहिल्यांदा कृष्णा दिसले. पंतप्रधान मोदी आणि कृष्णा एकाच व्यासपीठावर दिसले तरी त्यांच्या अनुभवाचा आपण काहीच उपयोग केला नाही, असे भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटते. तर त्यांच्याबरोबर भाजपात आलेल्या समर्थकांनी तिकीट न मिळाल्याने पुन्हा काँग्रेसचा रस्ता धरला आहे. दक्षिण कर्नाटकातील वक्कलिंग समाजात भाजपा कधीच सक्षम नव्हता, कृष्णा यांच्यामुळे दक्षिण भागात पक्ष मजबूत होईल, अशी भाजपाला अपेक्षा होती.
कृष्णा यांच्या मद्दुर तालुक्यातील भाजपाच्या कार्यालयाने या प्रदेशात भाजपाने चंचूप्रवेशही केला. मात्र तिकिटाच्या अपेक्षेत असणारे तालुकाप्रमुख लक्ष्मण कुमार तिकीट नाकारल्यावर पक्षातून बाहेर पडले. मद्दूरच्या कार्यालयातील सर्व झेंडे आणि फोटो उतरवण्यात आले आणि त्यांनी काँग्रेसचं दुसरं कार्यालय स्थापन केलं. हे सगळं गेल्या आठवड्यात निवडणुकीच्या तोंडावर झालं असून भाजपाचा येथील उमेदवार यामुळे एकटा पडला आहे. आपला भाजपात भ्रमनिरास झाला असे वाटून हे सगळे कार्यकर्ते परत काँग्रेसमध्ये गेले. या धामधुमीत कृष्णाही परत काँग्रेसमध्ये जातील अशा बातम्या होत्या. पण ते पंतप्रधानांबरोबर एकत्र दिसल्यामुळे ते एकटेच भाजपात राहिल्याचे दिसते. बेंगळुरुपासून केवळ ६५ किमी अंतरावर मद्दूरमध्ये मात्र त्यांच्याबरोबर आता कोणीच नाही.