नवी दिल्ली- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आज कर्नाटकातील विजयपुरा मतदारसंघामध्ये प्रचारसभेत भाषण करणार आहेत. दोन वर्षांनंतर त्या पहिल्यांदाच प्रचारसभेत बोलणार आहेत. विजयपुराशिवाय त्या कोणत्या प्रचारसभांमध्ये सहभागी होतील, याबद्दल काँग्रेसतर्फे अद्याप अधिक माहिती देण्यात आलेली नाही.काँग्रेसच्या सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी सोलापूर रोडवरील बीएलडीई वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेणार आहेत. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे हेदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये सोनिया गांधी यांनी प्रचारसभांमध्ये सहभाग घेतलेला नाही. उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मेघालय, त्रिपूरा, नागालँड या राज्यांच्या विधानसभांसाठी गेल्या दोन वर्षांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. आता कर्नाटक विधानसभेसाठीही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संपूर्ण राज्यभर प्रचार सुरु केला आहे. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सोनिया गांधीही प्रचारात सहभागी होत आहेत. 2 ऑगस्ट 2016 रोजी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या वेळेस सोनिया गांधी यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या अनुपस्थितीत राहुल गांधी यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये पक्षाचा प्रचार केला आहे.
Karnataka Assembly Elections 2018: दोन वर्षांनंतर सोनिया गांधी प्रचारसभेत सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 1:37 PM