Karnataka Assembly election 2018; सिद्धरामय्यांना पराभूत करणारे जायंट किलर जी. टी देवेगौडा आहेत तरी कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 12:00 PM2018-05-15T12:00:54+5:302018-05-15T12:02:02+5:30
जी. टी. देवेगौडा हे सिद्धरामय्या यांचे एकेकाळचे सहकारीच होते. मात्र सिद्धरामय्या यांना चामुंडेश्वरी मतदारसंघात पराभूत करण्यात त्यांना यश आले हे.
बेंगळुरू- कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे सिद्ध होतो आहे. कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री सिद्घरामय्या यांनी चामुंडेश्वरी आणि बदामी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या परंपरागत चामुंडेश्वरी मतदारसंघातच जी. टी. देवेगौडा यांच्याकडून ते पराभतूत झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देवेगौडा यांना 57 हजार 322 मते मिळाली असून सिद्धरामय्या यांना 35,056 मते मिळालेली आहेत. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच जी. टी. देवेगौडा यांनी मतांमध्ये आघाडी घेतल्याचे दिसत होते. अखेर सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरी मतदारसंघातून पराभव झाला.
जी.टी. देवेगौडा हे वक्कलिग समाजाचे नेते असून ते माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र कुमारस्वामी यांच्या जवळचे आहेत. त्यांनी जनता दल सेक्युलर पक्षाच्या तिकिटावर हुन्सुर आणि चामुंडेश्वरी मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. एकेकाळी जी. टी. देवेगौडा सिद्धरामय्या यांच्या जवळचे मानले जात असत. गेल्या दहा वर्षांमध्ये सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्वरी मतदारसंघाला वाऱ्यावर सोडले, त्यांनी कोणत्याही प्रकारे या मतदारसंघाची काळजी घेतली नाही अशी शब्दांमध्ये देवेगौडा यांनी सिद्धरामय्या यांच्यावर प्रचारादरम्यान टीका केली होती. कदाचित केवळ एकाच मतदारसंघात निवडणूक लढवणे धोक्याचे ठरू शकते हे याची सिद्धरामय्या यांना आधीच कल्पना आली असावी म्हणून त्यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असावा.
चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघात २००६ साली झालेल्या पोटनिवडणूकीत सिद्धरामय्या यांच्याबाजूने व्ही. श्रीनिवास प्रसाद आणि एच. विश्वनाथ मदतीसाठी होते. मात्र श्रीनिवास प्रसाद भाजपात गेले आहेत तर विश्वनाथ यांनी जनता दल धर्मनिरपेक्षमध्ये प्रवेश केला. हे महत्त्वाचे वरिष्ठ मित्र इतर पक्षांमध्ये गेले असले तरी नंजनगुंड आणि गुंडलुपेट येथे झालेल्या पोटनिवडणुका सिद्धरामय्या यांनी स्वतःच्या करिष्म्यावर काँग्रेसला निवडून दिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे चामुंडेश्वरीत ते पुन्हा एकदा जिंकतील असा काँग्रेसला विश्वास होता. तो विश्वास सत्यात उतरला नाही.