Karnataka Assembly Elections 2023: "कर्नाटकात पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार येणार" : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विश्वास
By ओमकार संकपाळ | Published: May 8, 2023 05:09 PM2023-05-08T17:09:08+5:302023-05-08T17:10:08+5:30
Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे.
Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. कर्नाटकात भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. दोन्ही पक्ष विजायाचा दावा करत आहेत. यातच आता कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, मी कर्नाटकातील सर्व भागांचा दौरा केला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्वच भागात भाजपचा वाढता प्रभाव आहे. लोकांचा उत्साह आणि मिळणारा पाठिंबा पाहता भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा शहा यांनी केला आहे. काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, भाजपने 4 टक्के मुस्लिम आरक्षण संपवले आहे, कारण ते घटनाबाह्य होते. आपल्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. काँग्रेसने तुष्टीकरणाच्या धोरणाखाली मुस्लिम आरक्षण दिले होते, ते आम्ही काढून टाकले आहे.
मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्हाला मुस्लिम आरक्षण 4% वरून 6% करायचे असेल तर ते इतर समाजाचे कमी करणार आहेत. ओबीसी, एससी, एसटी, लिंगायत की वोकलिंग, ते कोणाचे आरक्षण कमी करणार, हे कॉंग्रेस पक्षाने आधी स्पष्ट केले पाहिजे. आम्ही आरक्षणाच्या आत आरक्षण खूप विचारपूर्वक केले आहे. अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये आम्ही काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. काँग्रेसला त्या हटवायच्या आहेत. पण मी स्पष्ट करू इच्छितो की, जे आरक्षण एससीच्या आरक्षणात आहे, ते हटवले जाणार नाही.