Karnataka Assembly Elections: पाच वर्षांमध्ये कधी तीन तर कधी चार मुख्यमंत्री, कर्नाटक विधानसभेचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 05:58 PM2018-05-07T17:58:29+5:302018-05-07T17:58:29+5:30
कर्नाटक विधानसभेचा इतिहास पाहाता सलग पाच वर्षे एकाच मुख्यमंत्र्याला कार्यकाळ पूर्ण करण्याची वेळ फारच कमी वेळा आल्याचे दिसून येते.
बंगळुरु- कर्नाटक विधानसभेचा इतिहास पाहाता सलग पाच वर्षे एकाच मुख्यमंत्र्याला कार्यकाळ पूर्ण करण्याची वेळ फारच कमी वेळा आल्याचे दिसून येते.
"विधानसौधा'"मध्ये एकेका वेळेस चारचार किंवा तीन मुख्यमंत्री पाहिल्याची अनेकदा वेळ आली आहे.
पहिल्याच विधानसभेत के.सी. रेड्डी, केंगल हनुमंतय्या, कडिडल मंजाप्पा, एस. निजलिंगाप्पा असे चार मुख्यमंत्री होते. तर दुसऱ्या विधानसभेत एस. निजलिंगाप्पा, बी. डी. जत्ती अशी जोडी होती. तिसऱ्या विधानसभेत आधी एस. आर. कांती आणि नंतर पुन्हा निजलिंगाप्पा मुख्यमंत्री झाले. चौथ्या विधानसभेत निजलिंगाप्पा सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री झाले पण वीरेंद्र पाटील मुख्यमंत्री झाले. त्यानंतर देवराज अर्स पूर्ण पाचवर्षे मुख्यमंत्री झाले पण सहाव्या विधानसभेत त्यांच्या जागी आर. गुंडूराव आले. नंतर सातव्या विधानसभेत रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले मात्र ही विधानसभा दोन वर्षेच चालली. आठवी विधानसभा 1985 साली स्थापन झाली तिचा कार्यकाळ चार वर्षांचा होता त्यामध्ये हेगडेंबरोबर बोम्मईदेखील आले. नवव्या विधानसभेत वीरेंद्र पाटील, एस. बंगारप्पा आणि एम. विरप्पा मोईली हे तीन मुख्यमंत्री होतेय दहाव्या विधानसभेत एच. डी. देवेगौडा आणि जे. एम. पटेल हे मुख्यमंत्री होते.
अकराव्या विधानसभेत 1999 साली एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री झाले. त्यांनी 2004 पर्यंत सरकार चालवले. 2004 साली निवडणुका झाल्यावर त्रिशंकू विधानसभेत धरमसिंह पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यानंतर एच. डी. कुमारस्वामी आणि नंतर येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाले. अशा प्रकारे या विधानसभेत तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री पदावरती आले. त्यानंतर 2008 साली भाजपाचे दक्षिण भारतातील पहिले स्वबळावरील सरकार कर्नाटकात स्थापन झाले पण 110 जागा मिळूनही भाजपाला एकच मुख्यमंत्री पाच वर्षे कायम ठेवता आला नाही. येडीयुरप्पा, बी. एस. सदानंद गौडा आणि जगदिश शेट्टर असे तीन मुख्यमंत्री भाजपाने दिले. त्यानंतर 2013 साली काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन सिद्धरामय्या यांनी पाच वर्षे सलग सरकार सांभाळले.
विधानसभा कार्यकाळ मुख्यमंत्री
पहिली विधानसभा- 1952-1957 के. सी रेड्डी, केंगल हनुमंतय्या, कडिडल मंजाप्पा, एस. निजलिंगाप्पा
दुसरी विधानसभा- 1957-1962 एस. निजलिंगाप्पा, बी.डी. जत्ती
तिसरी विधानसभा- 1962-1967 एस. आर. कांती, एस. निजलिंगाप्पा
चौथा विधानसभा- 1967-1971 एस. निजलिंगाप्पा, वीरेंद्र पाटील
पाचवी विधानसभा- 1972-1977 डी. देवराज अर्स
सहावी विधानसभा- 1978-1983 डी. देवराज अर्स, आर. गुंडू राव
सातवी विधानसभा- 1983-1985 रामकृष्ण हेगडे
आठवी विधानसभा- 1985-1989 रामकृष्ण हेगडे, एस. आर बोम्मई
नववी विधानसभा- 1989-1994 वीरेंद्र पाटील. एस. बंगारप्पा, एम.विरप्पा मोईली
दहावी विधानसभा- 1994-1999 एच. डी. देवेगौडा, जे. एम. पटेल
अकरावी विधानसभा- 1999-2004 एस. एम. कृष्णा
बारावी विधानसभा- 2004-2007 धरमसिंह, एच.डी. कुमारस्वामी, बी.एस. येडीयुरप्पा
तेरावी विधानसभा- 2008-2013 बी.एस. येडीयुरप्पा, डी.व्ही सदानंद गौडा, जगदीश शेट्टर
चौदावी विधानसभा- 2013-2018 सिद्धरामय्या