बंगळुरू - काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने कर्नाटकच्या राजकारणा निर्माण झालेला पेच अद्याप निवळलेला नाही. एकीकडे कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसचे नेते सरकार टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे बंडखोर आमदारही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र या परिस्थितीत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी टाकलेल्या एका डावामुळे बंडखोर आमदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. विधानसभेतील कुठलाही बंडखोर आमदार मला भेटलेला नाही. तसेच 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांचे राजीनामे हे नियमांच्या चौकटीत बसणारे नसल्याचे त्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच मी या आमदारांना भेटण्यासाठी वेळही दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कर्नाटकमधील राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले आहे. तसेच आमदारांच्या राजीनाम्याबाबतही संशय निर्माण झाला आहे. ''मी संविधानाचे पालन करेन. तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीशी माझा काहीही संबंध नाही. मी संविधानानुसार काम करत राहीन. आतापर्यंत तरी कुठल्याही आमदाराने माझ्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितलेला नाही. जर कुणी मला भेटू इच्छित असेल तर मी माझ्या कार्यालयात उपस्थित असेन. मला जबाबदारीने निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी नियमांनुसार कुठलीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही,'' असे कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, आज काँग्रेसने बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये तब्बल 21 आमदार अनुपस्थित राहिल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांसोबत दोन अपक्ष आमदारांनीही पारडे बदलल्याने कर्नाटक सरकारसमोरील अस्थिरतेमध्ये अधिकच भर पडली आहे.
कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी टाकला 'असा' डाव, बंडखोर आमदारांसमोर निर्माण झाला पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 4:20 PM