बंगळुरू - कर्नाटक विधानसभेमध्ये अखेर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज बहुमत सिद्ध केले. दरम्यान, येडियुरप्पा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला असून, रमेश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय नाट्याला सुरुवात झाली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, रमेश यांनीही कणखर भूमिका घेत बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार रमेश कुमार यांनी दलबदलू आणि बहुमत चाचणीवेळी सभागृहात दांडी मारणाऱ्या 14 आमदारांना अपात्र ठरवले. विशेष म्हणजे 2023 पर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या या 14 आमदारांना अपात्र ठरविल्याचा आदेश रमेश कुमार यांनी दिला होता. दरम्यान, भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आज विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केले. कर्नाटक विधामसभेमध्ये आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कर्नाटकमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य काही काळासाठी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मात्र रमेश कुमार यांनी आज राजीनामा दिल्याने आता कर्नाटक विधानसभेमध्ये नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे.