बंगळुरु: एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळल्यानंतरही कर्नाटकमधील राजकीय नाट्य संपलेलं नाही. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं आहे. यामध्ये एका अपक्ष आमदाराचा आणि दोन काँग्रेस आमदारांचा समावेश आहे. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात एकूण १७ आमदारांनी बंड केलं होतं. या आमदारांनी त्यांचे राजीनामे रमेश कुमार यांच्याकडे सोपवले होते. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं. रमेश जारकिहोली आणि महेश कुमातल्ली या काँग्रेसच्या २ आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. तर अपक्ष आमदार आर. शंकर यांनादेखील अपात्र ठरवण्याचा निर्णय रमेश कुमार यांनी घेतला. राणेबेन्नूरचे आमदार असलेले आमदार आर. शंकर कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि इतर बंडखोर आमदारांसोबत मुंबईला गेले. शंकर यांनी त्यांचा केपीजेपी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. मात्र त्यानंतर ते सरकारमधून बाहेर पडले. शंकर आणि काँग्रेसच्या दोन आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आपण विशेषाधिकाराचा वापर करणार असून सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरणार असल्याचं कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आणि योग्यतेसंबंधी दाखल झालेल्या याचिकांवर निर्णय घेण्याचे अधिकार कुमार यांच्याकडे आहेत. आता बंडखोर आमदारांना माझ्यासमोर उपस्थित राहण्याची दुसरी संधी मिळणार नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. त्यामुळे आता कर्नाटकात काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.