नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली आहे. बलात्कार पीडितेला देखील त्या घटनेविषयी सारखे प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे आपली देखील अवस्था असल्याचे मंगळवारी (13 फेब्रुवारी) रमेश कुमार यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी होणाऱ्या आरोपांविषयी त्यांनी लक्ष वेधून घेतले. सरकारने हे ऑडिओ क्लिप प्रकरण एसआयटीकडे सोपवले आहे. ऑडिओ क्लिपच्या एसआयटी चौकशीप्रकरणी विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केले. भाजपा प्रदेश युनिटचे अध्यक्ष बी.एस.येदियुरप्पा यांना काँग्रेस-जद (एस) सरकार पाडण्याचा कथित प्रयत्नात जदच्या एका आमदाराला लालच दाखवण्याचा प्रयत्न ऑडिओ क्लिपमध्ये केला जात असल्याचे समोर येत आहे. सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपांचा संदर्भ देत माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे कारण तिला देखील त्या घटनेविषयी सारखे सारखे प्रश्न विचारले जात असतात असं रमेश कुमार यांनी म्हटलं आहे.
भाजपाकर्नाटक युनिट अध्यक्ष बी.एस. येदियुरप्पा यांनी ऑडिओ क्लिपच्या एसआयटी चौकशीचा विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करणाऱ्या संस्थेकडून या प्रकरणाचा शोध करुन घेणे योग्य राहणार नाही. कारण कुमारस्वामी स्वत: यामध्ये आरोपी आहेत. आपण जारी केलेल्या ऑडिओ क्लिपची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा कुमारस्वामी यांनी याआधी केली होती. या कथित चर्चेत येदियुरप्पा यांनी भाजपाच्या मदतीसाठी राजीनामा देणाऱ्या आमदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 50 कोटी देण्याचे म्हटले होते.