कर्नाटकात 'तेलही गेले अन्...'; भाजप तोंडघशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:58 PM2018-11-06T13:58:35+5:302018-11-06T13:59:10+5:30
बहुमत मिळूनही सत्तेची चव चाखायला मिळाली नसल्याने आधीच निराश झालेल्या नेतृत्वाला पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा नामुष्कीजनक हार पत्करावी लागली आहे.
बेंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या मेमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने सत्ताधारी काँग्रेसचा निसटता पराभव केला असला तरीही भाजपाचे डावपेच चुकले आहेत. बहुमत मिळूनही सत्तेची चव चाखायला मिळाली नसल्याने आधीच निराश झालेल्या नेतृत्वाला पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा नामुष्कीजनक हार पत्करावी लागली आहे.
कर्नाटमधील आज तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघांचे निकाल स्पष्ट झाले असून काँग्रेस-जेडीएस आघाडी 4 तर भाजपा एकाच जागेवर जिंकली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन खासदारांना आमदारकीसाठी राजीनामा द्यायला लावणे भाजपला महागात पडले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी शिमोगा मतदारसंघातून लोकसभेवर गेलेले बी एस येडीयुराप्पा यांनी राजीनामा दिला होता. तर बळ्ळारीहून लोकसभेवर गेलेले श्रीरामलू यांनीही आमदारकीसाठी राजीनामा दिला होता. मात्र, भाजपाच्या हा जुगार अंगाशी आला असून बळ्ळारीची जागा मोठ्या फरकाने गमवावी लागली आहे. तर येडीयुराप्पा यांचे पुत्र आणि माजी खासदार राघवेंद्र हे शिमोगा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
कर्नाटक विधानसभेमध्ये भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ 80 जागांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र, स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपाचे सत्तास्थापनेचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले होते. यामुळे जेडीएसच्या मदतीने काँग्रेसने सत्ता राखत मुख्यमंत्रीपद जेडीएसकडे दिले होते. या सर्व काळात भाजपवर मोठी नामुष्की ओढवली होती. त्यातच पोटनिवडणुकीतही बळ्ळारीसारखा आर्थिकदृषट्या महत्वाचा असलेला बालेकिल्ला गमवावा लागल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक राहिले असले तरीही भाजपच्या घोडदौडीला काहीसा ब्रेक लागणार आहे. सध्याचे वारे भाजपला अनुकुल नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.