'ऑपरेशन लोटस' पुन्हा फेल; सात महिन्यात दोनदा बिघडला भाजपाचा खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 12:39 PM2019-01-17T12:39:25+5:302019-01-17T12:40:07+5:30
अपयश आल्यानं भाजपाकडून ऑपरेशन लोटस स्थगित
बंगळुरु: कर्नाटकमधीलकाँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा धक्का बसला. ऐन मोक्याच्या वेळी काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडण्यास नकार दिल्यानं भाजपाचं ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरलं. काँग्रेस-जेडीएस सरकार उलथवण्याचा गेल्या सात महिन्यातला भाजपाचा हा दुसरा प्रयत्न होता. काँग्रेसच्या 12 ते 15 आमदारांना राजीनामे द्यायला लावण्याचा डाव भाजपानं आखला होता. मात्र भाजपाचा हा डाव फसला.
भाजपानं गेल्या काही दिवसांपासून आपल्या आमदारांना हरयाणातल्या गुरुग्राममधील एका रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. याशिवाय काँग्रेसच्या चार आमदारांना मुंबईत ठेवण्यात आलं होतं. मात्र सरकार पाडण्यासाठी जितक्या आमदारांची आवश्यकता आहे, तितके आमदार राजीनामा देण्यास तयार नसल्याची जाणीव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना झाली. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या आमदारांना ऑपरेशन लोटस स्थगित करत असल्याची माहिती दिली.
'एकाच वेळी काँग्रेस, जेडीएसच्या कमीत कमी 16 आमदारांनी राजीनामे द्यायला हवेत, असं पक्ष नेतृत्त्वानं म्हटलं होतं. त्यानुसार शनिवारपर्यंत काँग्रेसच्या 12 आमदारांनी पक्ष सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी पक्ष सोडण्यास नकार दिला,' असं येडियुरप्पा यांनी हॉटेलमध्ये असलेल्या भाजपाच्या आमदारांना सांगितल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी उद्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या आमदारांविरोधात पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.