मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर 2500 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आपल्याकडे करण्यात आली असल्याचा खळबळजनक दावा कर्नाटकातील भाजप आमदार बसनगौडा यतनाल यांनी केला आहे. यातनाल यांच्या या दाव्यानंतर, आता कर्नाटकात एक नवाच राजकीय वाद सुरू झाला आहे. यावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पीसीसी चीफ शिवकुमार यांनी केली आहे.
भाजप नेते बसनगौडा यतनाल म्हणाले, राज्यात काही असे ऐजन्ट आहेत, ज्यांनी आपल्याकडे राज्यात मुख्यमंत्री होण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना यतनाल म्हणाले, राजकारणात एक गोष्ट नेहमीच लक्षात असू द्या, या चोरांवर विश्वास ठेऊ नका. हे लोक तुमच्यापर्यंत पोहोचताच सोनिया गांधी अथवा जेपी नड्डा यांची भेट घ्या. एकदा तर, 2500 कोटी रुपये दिल्यास आपल्याला मुख्यमंत्री करण्यात येईल, असे मला सांगण्यात आले होते."
यतनाल म्हणाले, "मी स्वतःच विचार करत होतो, की त्यांना काय वाटते, 2500 कोटी काय आहे? ते हा पैसा कुठे ठेवतील? यामुळे तिकिटाच्या नावावर काळाबाजार करणाऱ्या या कंपन्या अत्यंत घोटाळेबाज आहेत."
यातनाल यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कर्नाटक काँग्रेस प्रमुख डीके शिवकुमार यांनी या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवकुमार म्हणाले, "हा एक राष्ट्रीय मुद्दा आहे आणि याची चौकशी व्हायला हवी."