बंगळुरू : सिग्नल ताेडल्यामुळे अडविणाऱ्या वाहतूक पाेलिसांसाेबत कर्नाटकच्या भाजप आमदाराच्या मुलीने वाद घालून दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, आमदार कन्येकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, मुलीच्या आमदार वडिलांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. बंगळुरूतील राजभवनाजवळ ही घटना घडली. भाजपचे आमदार अरविंद लिंबावली यांची मुलगी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमधून जात हाेती. लाल दिवा असूनही ती गाडी न थांबविता निघून गेली. वाहतूक पाेलिसांनी तिला पुढे थांबविले. त्यावेळी मी आमदारांची मुलगी आहे, असे सांगून तिने दमदाटी करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ रेकाॅर्डिंग करणाऱ्या पत्रकारांसाेबतही तिने उद्धट वर्तन केले. पाेलिसांनी तिच्या बाेलण्याकडे दुर्लक्ष करून तिला १ हजार रुपयांचा दंड ठाेठावला. (वृत्तसंस्था)
यापूर्वीही केले होते नियमांचे उल्लंघनगाडी चालविताना तिने सीटबेल्टही घातलेला नव्हता. यापूर्वीही काही वेळा वाहतुकीच्या नियमांचे तिने उल्लंघन केल्याचे आढळून आले असून, त्याचा हजार रुपयांचा दंड भरलेला नव्हता. ताे जाेडून तिच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.