बंगळुरु : कर्नाटकमध्ये सत्तासंघर्ष सुरूच असून काल गुरुवारी मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, यावरून विधानसभेत गोंधळ झाल्याने अध्यक्षांनी शुक्रवारपर्यंत कामकाज तहकूब केले. गुरुवारी काँग्रसे-जेडीएसचे 15 बंडखोर आणि काँग्रेसचे अन्य दोन आमदार अनुपस्थित होते.
कर्नाटक विधानसभेत काल वेगळेच नाट्य रंगले होते. मध्यांतरामध्ये काँग्रेसचे ब्रेन समजले जाणारे डी के शिवकुमार हे भाजपचे नेते येडीयुराप्पा यांचे जवळचे आणि सुषमा स्वराज यांचे मानसपूत्र श्रीरामलू यांच्याशी गहन चर्चा करताना दिसले. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी चार ते 5 भाजपाचेआमदार सरकारच्या बाजुने मतदान करतील, असा दावा केला होता. मात्र, काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी विधानसभेत जाण्याऐवजी मुंबईतच राहणे पसंत केल्याने कुमारस्वामींकडे काल 98 मते होती. तसेच बसपाच्या सदस्यासह दोन अपक्षांनीही काल दांडी मारली होती.
यावरून संतप्त झालेल्या भाजपा आमदारांनी विधानसभेतच रात्रभर धरणे आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला. य़ेडीयुराप्पांच्या घोषणेनंतर भाजपाच्या काही आमदारांनी उशी आणि बेडसीट आणत विधानसभेतच झोपण्याचा निर्णय घेतला. तर अन्य आमदारांनी सोफा, चादर पाहून झोपत विधानसभेतच रात्र घालविली. काही आमदार सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग वॉकही करताना दिसत होते.