बंगळुरु: कर्नाटक विधानसभा निवडणूक होऊन सात महिने झाले आहेत. या कालावधीत भाजपानं दोनवेळा काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र तरीही भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी प्रयत्न सोडलेले नाहीत. आपल्याला मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याचं येडियुरप्पा यांना वाटतं. यामागे येडियुरप्पा यांचे ज्योतिष असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांच्याकडून पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची शक्यता आहे. अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे येडियुरप्पा यांचाही ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. 15 जानेवारीनंतरचं ग्रहमान अनुकूल असेल, असं केरळच्या एका ज्योतिषानं येडियुरप्पांना सांगितल्याचं वृत्त आहे. ग्रहमान चांगलं असल्यानं हमखास सत्ता मिळेल, असं भाकीत ज्योतिषानं वर्तवल्यानं येडियुरप्पा सत्ता मिळवण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांशीही त्यांची बातचीत सुरू आहे. येडियुरप्पा यांना एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याची साथ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेडीएससोबतचं आघाडी सरकार सुरू राहू नये, अशी या काँग्रेस नेत्याची इच्छा आहे. त्यामुळेच दोनवेळा ऑपरेशन लोटस फसूनही सत्ता मिळेल, असा विश्वास येडियुरप्पांना आहे. काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता पक्षातील आमदारांसह भाजपाला मदत करत असल्याचं वृत्त नवभारत टाईम्सनं दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी भाजपानं सर्व आमदारांना गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यावेळी शनिवारी (19 जानेवारी) काहीतरी नक्की घडेल, अशी माहिती एका वरिष्ठ भाजपा नेत्यानं दिली. 'एक भाजपा नेता '19-19-19'बद्दल बोलत होता. म्हणजेच 19 जानेवारीला दुसऱ्या पक्षांचे 19 आमदार आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे,' अशी माहिती या नेत्यानं दिली. येडियुरप्पा बंगळुरुमधून योग्य इशाऱ्याची वाट पाहत आहेत. मात्र हा इशारा नेमका कोण देणार, याची माहिती आपल्याकडे नाही, असंही या नेत्यानं सांगितली.
ज्योतिषाची साथ अन् काँग्रेसचा 'हात'; कर्नाटकात भाजपाचा '19-19-19'च्या मंत्रावर विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 10:11 AM