Karnataka BJP : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत अनेकांनी तिकीटे कापली, ज्यामुळे पक्षातील अनेकांनी बंडखोरी केली. अशातच, कर्नाटकतील बंडखोर नेते केएस ईश्वरप्पा यांच्यावर भाजपने मोठी कारवाई केली आहे. कर्नाटक भाजपने ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. आपल्या मुलाला हावेरीमधून लोकसभेचे तिकीट न दिल्याने नाराज असलेले ईश्वरप्पा यांनी शिवमोग्गा येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
केएस ईश्वरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करुन आपल्या मुलाला हावेरीतून तिकीट मागितले होते. मात्र पक्षाने मुलाला तिकीट न दिल्याने त्यांनी बंडखोरी केली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच, येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय राघवेंद्र यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईश्वरप्पा यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी ते ऐकले नाही. अखेर त्यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आले.
आपला लढा बीएस येडियुरप्पा यांच्या कुटुंबाविरुद्ध असल्याचे ईश्वरप्पा यांचे म्हणणे आहे. ईश्वरप्पा म्हणतात की, येडियुरप्पा आपल्या मुलाला तिकीट मिळवून देतात, पण माझ्या मुलाला तिकीट देत नाहीत. दरम्यान, ईश्वरप्पा यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींचे फोटो वापरले होते, ज्याविरोदात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना पीएम मोदींचा फोटो न वापरण्याचे निर्देश दिले.