बंगळुरू : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिर पूर्ण तयार होऊन त्यात २०२४ मधील मकरसंक्रांतीनंतर शुभमुहूर्तावर रामलल्ला विराजमान होतील. त्यानंतर सर्व भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच, पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. दरम्यान, कर्नाटककाँग्रेसचेआमदार बीआर पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले आहे.
कर्नाटक भाजपने त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आणि हिंदू मतांचे एकीकरण करण्यासाठी भाजप राम मंदिरावर बॉम्बहल्ला करून मुस्लिम समाजावर आरोप करू शकते, असे बीआर पाटील म्हणताना ऐकू येत आहे. कर्नाटकच्या आमदाराने आपल्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेस नेते असे म्हणताना ऐकू येत आहेत की, जर मोदी पुढच्या लोकसभा निवडणुकीत जिंकले तर ते (भाजप) राम मंदिरावर बॉम्बहल्ला करू शकतात आणि हिंदूंना एकत्र करण्यासाठी याचा दोष मुस्लिमांवर टाकतील.
बीआर पाटील यांचे हे विधान कधीचे आहे, याबाबत अद्याप काही समजले नाही. बीआर पाटील यांच्या या व्हिडिओवर भाजपने आपली प्रतिक्रिया दिली आहे. "हिंदू धर्माच्या पायावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेस सदस्यांची राम मंदिराकडे वाईट नजर आहे", असे भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले. दरम्यान, कर्नाटकात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या.