- संतोष मोरबाळे बंगळुरू - कर्नाटक अनेक वर्षे कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांनीही कर्नाटकमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, १९९६ च्या निवडणुकीनंतर कॉँग्रेसच्या लोकप्रियतेत घट झाली. या बदलत्या परिस्थितीमुळेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला प्रथमच निधर्मी जनता दल (जेडीएस) बरोबर आघाडी करावी लागली आहे. राज्यात कॉँग्रेस २०, तर जेडीएस ८ जागांवर लढणार आहे.काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाने आपली मुळे घट्ट केल्यानेच कॉँग्रेसला आता जेडीएसबरोबर आघाडी करावी लागत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्या काळात कर्नाटकने नेहमीच कॉँग्रेसला साथ दिली. त्यामुळे १९५२ ते १९८९ या ३६ वर्षांच्या काळात कर्नाटकात कॉँग्रेस अपराजित राहिला.कॉँग्रेस बालेकिल्ल्याला १९८३ मध्ये प्रथमच तडे जाण्यास सुरुवात झाली. जनता पार्टीने विधानसभेत बहुमत मिळवून प्रथमच बिगरकॉँग्रेसी रामकृष्ण हेगडे यांना मुख्यमंत्री बनविले. मात्र, काळाच्या ओघात जनता पार्टीचे अनेक गटांत विभाजन झाले. सध्या फक्त देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस राज्यात अस्तित्वात आहे. त्यांचे अस्तित्वही मंड्या, हसन, म्हैसूरचा काही भाग व चामराजनगर या भागांतच दिसून येते.कॉँग्रेसने १९८९च्या लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २७ जागा जिंकल्या होत्या. जनता पार्टीला एकच जागा मिळाली, पण १९९१ पासून भाजपाने आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. त्या निवडणुकीत भाजपाने ४ जागा जिंकून कर्नाटकात घुसखोरी केली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपा नेते बी. एस. येडियुरप्पा व अनंतकुमार यांनी लिंगायत समाजाच्या आधारे राजकारण सुरू केले.भाजपाने १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत २२४ पैकी ४० जागा जिंकल्या, तर १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आणखी दोन जागा जिंकून संख्याबळ ६ वर नेले. बाबरी मशिदीच्या पाडावानंतर १९९२मध्ये भाजपाने कर्नाटकात हातपाय पसरण्यास प्रारंभ केला. हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन त्यांनी निवडणुका लढवण्यास सुरुवात केली. कॉँग्रेसचा भर मात्र वक्कालिग व अल्पसंख्याक समाजावरच राहिला.मोठ्या प्रमाणात असलेला लिंगायत समाज कॉँग्रेसपासून दूर जाण्यास राजीव गांधी कारणीभूत ठरले. लिंगायत समाजाचे वीरेंद्र पाटील १९९०मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे राजीव गांधी त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्याच वेळी चामराजनगर व दावणगेरे येथे जातीय दंगली सुरू झाल्या. वीरेंद्र पाटील यांना भेटून परत जात असताना राजीव गांधी यांनी बंगळुरू विमानतळावरच पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले. यामुळे वीरेंद्र पाटील यांना मोठा धक्का बसला. त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता एस. बंगारप्पा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या लिंगायत समाजाने आजपर्यंत कॉँग्रेसला माफ केलेले नाही.भाजपाने १९९८च्या लोकसभा निवडणुकीत १३ जागा जिंकून मोठे यश मिळविताना कॉँग्रेसच्या अनेक बालेकिल्ल्यात सुरुंग लावला, पण २००४ची लोकसभा निवडणूक भाजपासाठी खूपच फलदायी ठरली. भाजपाने २८ पैकी १८ जागा जिंकल्या. २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेत १७ जागा जिंकून कॉँग्रेसचा बालेकिल्ला आपल्या बाजूने वळविला.लिंगायत समाज राज्यात वक्कलिगाकडे जमीनदार म्हणून पाहतो, तर दलित, आदिवासी, अल्पसंख्याक वक्कलिगाकडे शत्रुत्वाच्या नजरेने पाहतात.याच जातीय समीकरणाचा फायदा घेत, भाजपाने आपले स्थान बळकट केले आहे. या निवडणुकीतही कॉँग्रसपुढे अनेक प्रश्न आहेत. गटबाजी, नाराजांची संख्या यामुळे कॉँग्रेस भाजपापुढे कितपत आव्हान निर्माण करू शकतो, हे पाहावे लागेल.
कर्नाटक : कॉँग्रेसच्या दक्षिणेतील बालेकिल्ल्यात भाजपाचा जोरकस प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 6:08 AM