ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - कर्नाटकमध्ये होणा-या आगामी विधानसभा निवडणुकीत बीएस येडियुरप्पा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. दक्षिणेत कर्नाटकमध्ये भाजपा पहिल्यांदा सत्तेवर आली. त्यावेळी येडियुरप्पा मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते.
सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पुढच्यावर्षी मे 2018 मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. के.सिद्घरमय्या सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. पीटीआयशी बोलताना अमित शहा यांनी कर्नाटकसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपानीच गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे संकेत अमित शहा यांनी दिले. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत 150 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा शहा यांनी केला.
हिमाचलप्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल ? त्याचे नाव शहा यांनी उघड केले नाही. गुजरातबरोबर हिमाचलमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कर्नाटक भाजपामध्ये सध्या जोरात अंतर्गत गटबाजी सुरु आहे. माजी उपमुख्यमंत्री के.ईश्वराप्पा गटाने येडियुरप्पा यांना लक्ष्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचेच नाव जाहीर करुन टाकले. भाजपाने अलीकडेच काही नेत्यांवर पक्षशिस्त पाळत नसल्याने कारवाई केली होती.