बंगळुरू : वेतनाच्या मुद्द्यावरून कर्नाटकच्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे मागील आठ दिवसांत १५२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महामंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे ७० कोटी रुपयांचे, बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाचे २० कोटी रुपयांचे, वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाचे ३०.५ कोटी रुपयांचे, तर ईशान्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाचे ३१.५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.संपकरी कर्मचारी कामावर परतले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. संपात सामील झाल्याबद्दल प्रशिक्षणार्थी व परिवीक्षा कर्मचाऱ्यांना सेवेतून बरखास्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी एका संदेशात म्हटले आहे की, सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांच्या नऊ पैकी आठ मागण्या मान्य केलेल्या आहेत. पुढील वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य करण्यात येणार नाही. राज्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे ही मागणी कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
१७,००० बसेसपैकी ३,०२४ बसेसच सुरू- परिवहन विभागाच्या चारही महामंडळांपैकी एकूण १७,००० बसेसपैकी ३.०२४ बसेसच सुरू आहेत. यापैकी १,५७२ बसेस केएसआरटीसीची तर ३९४ बसेस बीएमटीसीच्या आहेत.- बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. बस वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत.- सेवानिवृत्त झालेल्या व वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याची विनंती केली आहे.nतसेच काही खासगी कर्मचाऱ्यांचीही या कामी मदत घेण्यात येत आहे.