कर्नाटकात (karnataka) भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा मदल प्रशांत याला ४० लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. एका स्मार्ट वॉचमुळे हे प्रकरण उघडकीस आले. व्यावसायिकाने लाच देत असताना स्मार्ट वॉच लावला होता, या वॉचमध्ये कॅमेरा सेट केला होता. दरम्यान, लाच देत असतानाचा व्हिडीओ आणि संभाषण या वॉचमध्ये रेकॉर्ड झाले असून आता पुराव्यामुळे आमदार पुत्राला तुरुंगात जावे लागले आहे.
भाजप आमदार पुत्र प्रशांत याला लोकायुक्त पथकाने २ मार्च रोजी ताब्यात घेतले. कर्नाटकातील व्यावसायिक श्रेयस कश्यप यांना कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडला तेल पुरवण्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी त्यांच्या कंपनी केमिक्सिल कॉर्पोरेशन आणि सहयोगी फर्म डेलिसिया कॉर्पोरेशनने लाच दिली होती. १.२ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला.
युपीत थरार! उमेश पालवर पहिली गोळी झाडणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर, पोलिसांनी ठेवले होते बक्षीस
या लाच प्रकरणात लोकायुक्तांच्या पथकाने प्रशांतला अटक केली. पण आमदार आणि केएसडीएलचे अध्यक्ष विरुपाक्षप्पा यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार आमदार विरुपक्षप्पा यांना मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. २ आणि ३ मार्च रोजी लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये प्रशांतच्या वैयक्तिक कार्यालयातून २ कोटी रुपये आणि मादल विरुपक्षप्पा यांच्या निवासस्थानातून ६,१०,३०,००० रुपये जप्त करण्यात आले.
एफआयआरनुसार, व्यापारी कश्यप आणि त्यांचे सहकारी एस मूर्ती आणि प्रशांत यांच्यात करार मिळवण्यासाठी ८१ लाख रुपयांमध्ये करार झाला होता. लाचेचा पहिला हप्ता म्हणून ४० लाख रुपये द्यायचे होते. आमदारांच्या मुलाला रंगेहाथ पकडण्यासाठी स्मार्ट घड्याळातील स्पाय कॅमेरा हा एकमेव मार्ग उरला होता. याचे कारण म्हणजे प्रशांतच्या ऑफिसची सुरक्षा व्यवस्था अतिशय मजबूत होती. त्याला कोणी भेटायला गेले की त्याचा मोबाईल व इतर वस्तू बाहेर जमा केल्या जात होत्या. त्यामुळे व्यावसायिकाने स्मार्ट वॉचचा वापर केला.