Karnataka Bypolls: कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपचा १२ जागांवर विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 04:47 AM2019-12-10T04:47:08+5:302019-12-10T05:59:02+5:30
पोटनिवडणुकांंमध्ये भाजपचे सहापेक्षा कमी आमदार निवडून आले असते तर येडीयुरप्पा सरकार बहुमताच्या अभावी कोसळले असते.
बंगळुरू : कर्नाटकमधील बंडखोर आमदारांवर केलेल्या कारवाईनंतर १५ विधानसभा जागांवर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांत भाजपने १२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे.
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या सरकारला बहुमतासाठी सहा जागांसाठी आवश्यकता असताना त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्याने आता हे सरकार स्थिर झाले आहे. काँग्रेसने फक्त दोन जागा जिंकल्या असून जनता दल (एस)ला एकाही जागेवर विजयी पताका फडकाविता आलेली नाही. या पोटनिवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून त्यात एक अपक्ष उमेदवारही विजयी झाला आहे. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेमध्ये येडीयुरप्पा सरकारला याआधी भाजपचे १०५ व एक अपक्ष आमदार अशा १०६ लोकांचा पाठिंबा होता.
पोटनिवडणुकांंमध्ये भाजपचे सहापेक्षा कमी आमदार निवडून आले असते तर येडीयुरप्पा सरकार बहुमताच्या अभावी कोसळले असते. या पोटनिवडणुकांमध्ये वोक्कलिग समाजाला आपल्या बाजूला वळविण्यास भाजप यशस्वी ठरला. इतर मतदारसंघांमध्येही भाजपने काँग्रेसला धुळ चारली आहे.
म्हैसूर प्रांतामध्ये चांगला जनाधार असलेल्या जनता दल (एस) या पक्षाचा यशवंतपूर येथील उमेदवार तसेच या पक्षाने होस्कोटे या मतदारसंघात पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार हे पराभूत झाले आहेत. झारखंडमध्ये पंतप्रधान मोदी यांनी, जनादेशाचा अपमान करून मागच्या दाराने चोरांप्रमाणे कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसला पोटनिवडणुकांत जनतेने चांगलीच अद्दल घडविली आहे, असा टोला लगावला.तर कर्नाटकमध्ये भाजप विकासाभिमुख व स्थिर सरकार देईल असे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे.
सिद्धरामय्या म्हणाले, काँग्रेसला पराभव मान्य पोटनिवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेसचा केलेला पराभव आम्ही स्वीकारतो असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.लोकशाहीचा आम्ही आदर करतो असेही ते म्हणाले. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेता या पदाचा राजीनामा सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.