बरही - कर्नाटकात जनतेच्या जनादेशाचा विजय झाला आहे. काँग्रेस आता लोकांची विश्वासघात करु शकणार नाही. हा संदेश संपूर्ण देशात गेला असेल की जर कोणी जनतेच्या पाठित खजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच जनता त्यांना शिक्षा देते. जनतेने भाजपाला नवी ताकद दिली आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानत शिवसेनेवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
झारखंडमधील बरही याठिकाणी प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, दक्षिण भारतात भाजपा कमकुवत आहे असं बोललं जात होतं. पण कर्नाटकात आलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालाने त्याला उत्तर मिळालं. जनतेचा कौल नाकारुन मागच्या दरवाजाने सरकार स्थापन करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकविला. लोकशाही पद्धतीने जनतेने त्यांचे कटकारस्थान उद्ध्वस्त केले. पोटनिवडणुकीत भाजपा सरकार राहणार की जाणार असा प्रश्न केला जात होता. त्याला जनतेने उत्तर दिले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच काँग्रेसने कर्नाटकात भाजपाला सरकार बनवू दिलं नाही, त्यांना जनतेने शिक्षा दिली. कर्नाटकात स्थिर आणि विकासासाठी भाजपाला विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. या १५ जागेंवर गेल्या ७० वर्षापासून भाजपाचा विजय झाला नव्हता. मात्र गद्दारांना धडा शिकविण्यासाठी जनतेने त्याठिकाणी भाजपाचं कमळ फुलविले. काँग्रेस कधीही आघाडी धर्माचे पालन करत नाही, भ्रष्टाचारासाठी काँग्रेस कोणत्याही मर्यादा पार करु शकते. झारखंडच्या जनतेने कर्नाटकच्या निकाल लक्षात ठेवावा अशा शब्दात काँग्रेसवर टीका केली आहे.
कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपाने पहिला विजय नोंदविला असून 15 पैकी 11 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाने येल्लापूरची जागा 31 हजार मतांनी जिंकली आहे. या 12 जागांवर काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांनाच भाजपाने मैदानात उतरविले होते. याचा फायदा भाजपाला झाला आहे.
कर्नाटक विधानसभेत रंगलेला सत्तासंघर्षाचा खेळ महाराष्ट्रातही रंगला होता. देवेंद्र फडणवीसांनी जशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली तशीच शपथ येडीयुराप्पांनीही दोन वर्षांपूर्वी घेतली होती. मात्र, संख्याबळ नसल्याने फडणवीसांसारखाच राजीनामाही देऊन टाकला होता. महत्वाचे म्हणजे भाजपा महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्येही सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नंतर येडीयुराप्पांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या 17 आमदारांना फोडले आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला. यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले आणि काँग्रेससोबतची आघाडीही तुटली.