कर्नाटकमधील असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्रिपदं न मिळाल्यानं नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 06:46 PM2018-06-08T18:46:59+5:302018-06-08T18:46:59+5:30
काँग्रेस आमदार संपर्कात असल्याच्या वृत्ताला भाजपा नेत्यांचा दुजोरा
बंगळुरु: कर्नाटकमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेस आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांनी काँग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नाराज आमदार भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. यापैकी अनेकांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय जवळपास नक्की केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसचे आमदार एच. एम. रेवन्ना यांनी भाजपाच्या संपर्कात असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. मी भाजपा नेत्यांच्या संपर्कात असून भाजपामध्ये प्रवेश करु शकतो, असं रेवन्ना यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. विशेष म्हणजे काँग्रेसचे असंतुष्ट आमदार संपर्कात असल्याच्या वृत्ताला भाजपाच्या नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी के. सी. वेणुगोपाल आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी त्यांची जबाबदारी नीट पार पाडली नाही, अशी बहुतांश आमदारांची तक्रार आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळेल, अशी अपेक्षा अनेक आमदारांना होती. मात्र बऱ्याच आमदारांची लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. हे आमदार आणि त्यांचे समर्थक येत्या गुरुवारी पक्षाविरोधात आंदोलन करणार आहेत. मंत्रीपद न मिळाल्यानं पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांच्या हालचालींवर वरिष्ठ नेत्यांकडून लक्ष ठेवलं जात असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. शुक्रवारपर्यंत आमदारांची नाराजी दूर झालेली असेल, असा विश्वास काँग्रेसमधील नेते व्यक्त करत आहेत.