बंगळुरू : पोलीस उप अधीक्षक एम. के. गणपती यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावे लागलेले कर्नाटकचे माजी मंत्री के. जे. जॉर्ज यांचा सोमवारी मंत्रिमंडळात पुन्हा समावेश झाला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जॉर्ज हे निर्दोष असल्याचा अहवाल दिल्यानंतर त्यांचा समावेश झाला. जॉर्ज हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्ती समजले जातात. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनवर झालेल्या कार्यक्रमात जॉर्ज यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. पोलीस उप अधीक्षक गणपती यांच्या आत्महत्येसंबंधात जॉर्ज आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांवर प्रथम माहिती अहवाल दाखल करा, असे आदेश कोदागु जिल्ह्यातील मडिक्केरी न्यायालयाने दिल्यानंतर १८ जुलै रोजी जॉर्ज यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. गणपती यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्थानिक टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माझे काही बरेवाईट झाल्यास त्याला मंत्री जॉर्ज व पोलीस अधिकारी ए. एम. प्रसाद व प्रणब मोहंती जबाबदार असतील, असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)
कर्नाटकच्या मंत्रिमंडळात के. जे. जॉर्ज पुन्हा दाखल
By admin | Published: September 27, 2016 1:35 AM