बंगळुरू : कर्नाटक हे गुंतवणुकीचे प्रमुख ठिकाण म्हणून पुढे आले आहे. ‘डबल इंजिन’च्या सरकारमुळे राज्याचा विकास वेगाने होत असून कर्नाटक प्रगतीच्या बाबतीत केवळ राज्यांनाच नाही तर देशांनाही आव्हान देत आहे, असे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तीन दिवसीय आंतराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पाच महिन्यांनी राज्यात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या गुंतवणूक परिषदेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदी म्हणाले, राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षा सरकार आहे. हेच एक कारण आहे की राज्य अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत आहे. सहजतेने व्यवसाय करण्याच्या बाबतीत (इज ऑफ डुइंग) राज्य अव्वल क्रमांकावर आहे. कर्नाटक आज जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान क्लस्टर्सपैकी एक म्हणून ओळखले जाते. जेव्हाही प्रतिभा आणि तंत्रज्ञानाविषयी चर्चा होते, तेव्हा मनात सर्वात पहिले नाव येते बंगळुरूचे. ‘ब्रँड बंगळुरू’ म्हणून ते जगभरात स्थापित झाले आहे.
झोपडपट्टीवासीयांना दिले डोक्यावर छत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजधानी दिल्लीतील कालकाजी भागात झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी ३०२४ नव्याने बांधलेल्या सदनिकांचे उद्घाटन केले.