- संजय शर्मानवी दिल्ली : दक्षिण भारतातील भाजपचा एकमेव बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकात वापसीसाठी पक्षाला संपूर्ण ताकद पणाला लावावी लागत आहे. भाजपला बी. एस. येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणे महागात पडत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यात पुन्हा सत्तावापसी करण्यासाठी भाजप रणनीती तयार करण्यात गुंतला आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सध्या उमेदवारांच्या निवडीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कर्नाटकच्या २२४ सदस्यीय विधानसभेत भाजप व एनडीएचे ११९ आमदार आहेत. यातील ४० टक्के आमदारांची तिकिटे कापली जाणार आहेत. भाजप कर्नाटकात स्वबळावर निवडणूक लढवणार असून, जनता दल एसशी समझोता करणार नाही.
कर्नाटकच्या उमेदवार निवडीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ५ एप्रिलच्या आसपास होणार आहे. ही निवडणूक भाजप पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा भाजपचे कर्नाटकातील सर्वांत मोठे स्टार प्रचारक असतील. कर्नाटकात भाजप विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना भावी मुख्यमंत्री म्हणून समोर आणणार नाही. बोम्मई यांच्यामुळे भाजपला नुकसान होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर बोम्मई यांना बदलणे पक्षाला योग्य वाटले नाही, असे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर?
राज्याचा आणखी विकास पाहिजे असेल तर राज्यात डबल इंजिनचे सरकार पाहिजे, असे कर्नाटकच्या जनतेला भाजप सांगणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच भाजपकडून राज्यात एकाचवेळी ४० पेक्षा जास्त नेते, केंद्रीय मंत्री, स्टार प्रचारक निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. nभाजपचे सर्वांत मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार दौरा ८ ते १० एप्रिलच्या दरम्यान सुरू होणार आहे. मोदी म्हैसूर येथील राष्ट्रीय पार्कमध्ये जाणार आहेत. कर्नाटकच्या नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर प्रचारासाठी सर्वांत जास्त मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आहे.