बंगळुरू - भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आज विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केले. कर्नाटक विधानसभेमध्ये आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कर्नाटकमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य काही काळासाठी संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पा हे विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार का याची उत्सुकता सर्वांना लागली होती. दरम्यान, आज विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असा विश्वास येडियुरप्पांनी व्यक्त केला होता.
आज विधानसभेमध्ये विश्वासमत प्रस्ताव सादर करताना येडियुरप्पा म्हणाले की, राज्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. आम्ही ते व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही, याचा विश्वास आम्ही तुम्हाला देतो.''शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येडियुरप्पा म्हणाले की, राज्यात दुष्काळ पडला आहे. मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलू इच्छितो. पंतप्रधान शेतकरी योजनेंतर्गत दोन हजार रुपयांचे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय मी घेतला आहे. आता आमच्यासोबत राहून काम करा, असे आवाहन मी विरोधी पक्षांना करतो. तसेच एकमताने माझ्यावर विश्वास दर्शवा, असे आवाहन मी सभागृहाला करतो.
दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी विश्वासमत प्रस्तावाला विरोध करताना मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले येडियुरप्पा सरकार कसे टिकवणार असा सवाल केला. ''येडियुरप्पाजी तुम्हा बंडखोरांसोबत आहात. तुम्ही स्थिर सरकार कसे काय देणार? हे अशक्य आहे. मी या विश्वासमत प्रस्तावाला विरोध करतो. कारण हे सरकार असंवैधानिक आणि अनैतिक आहे.'' असे सिद्धारामय्या म्हणाले.