नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांनी मतदारांना भावनिक होऊन आवाहन करणं काही नवीन राहिलं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी हे मतदारांसमोर भाषण करताना भावूक होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कुमारस्वामी यांनी भाषणामध्ये मिडीयाकडून प्रत्येक दिवशी आजचा दिवस माझा शेवटचा दिवस आहे असा प्रचार होऊ लागला या उल्लेखाने व्यासपीठावर कुमारस्वामींना रडू कोसळले.
कर्नाटकातीलमंड्या येथील जाहीर सभेत बोलताना कुमारस्वामी भावूक झाले. माझा मुख्यमंत्रीपदाचा शेवटचा दिवस आहे. माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत अशाप्रकारे प्रचार विरोधकांकडून केला जातोय असा आरोप त्यांनी केला. मंड्या लोकसभा मतदारसंघातून एच डी कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखील कुमारस्वामी निवडणूक लढवत आहेत. यामुळेच जेडीएस सर्व ताकदीने या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. याआधीही कुमारस्वामी अनेकदा मतदारांसमोर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीचे कुमारस्वामी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांनाही माध्यमासमोर रडू कोसळले होते.
दरम्यान या लोकसभा मतदारसंघात जेडीएसचे दिवंगत नेते अंबरिश यांच्या पत्नीने बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उभी राहिली आहे. एच डी कुमारस्वामी यांनी जाहीर सभेत अंबरिश यांना जेडीएसमुळे जगात ओळख मिळाली मात्र आज त्यांचा परिवार जेडीएसविरोधात उभा आहे. अंबरिश यांच्या पत्नी सुमनलता या प्रचारसभेत जेडीएस चोरांची पार्टी असल्याचा प्रचार करत आहे.
कर्नाटकमध्ये २८ लोकसभा जागांसाठी १८ आणि २३ एप्रिल रोजी याठिकाणी मतदान होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातून भारतीय जनता पार्टीने १७ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदा भाजपा कर्नाटकात किती जागांवर निवडून येते ते लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
एच डी कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखील कुमारस्वामी काँग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त उमेदवार आहेत. निखील कुमारस्वामी यांच्याविरोधात बसपा, जदयू, समाजवादी पार्टीसह अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या युतीमध्ये काँग्रेस २० जागांवर तर जेडीएस ८ जागांवर निवडणूक लढवत आहे.