बंगळुरू - अभ्यासात ढ असल्याने वर्गात शिक्षकांचा ओरडा खाणारे आपल्या आसपास अनेकजण असतील. पण मोठे झाल्यावर तशी कबुली कुणी देत नाही. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी याला अपवाद ठरले आहेत. शाळेत असताना मी ढ होतो. तसेच पहिल्या बेंचवर बसल्यावर शिक्षक प्रश्न विचारत त्यामुळे मी नेहमी मागच्या बेंचवर बसत असे, अशी कबुलीच कुमारस्वामी यांनी दिली. जयानगर येथील नॅशनल डिग्री कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात कुमारस्वामी सहभागी झाले होते. याच कॉलेजमधून कुमारस्वामी यांनी विज्ञान विषयाची पदवी मिळवली होती. तब्बल 12 वर्षांनंतर कुमारस्वामी आपल्या कॉलेजमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले. ते म्हणाले, "विद्यार्थीदशेत असताना मी डॉ. राज कुमार यांचा चाहता होते. तसेच त्यांचे चित्रपट न चुकता पाहायचो. जर मी चांगला विद्यार्थी असतो तर आज आएएस अधिकारी बनलो असतो. पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं." अशा वागण्यामुळे शालेय जीवनात वडिलांकडून ओरडा खावा लागत होता, अशीही कबुली त्यांनी दिली. "लहानपणी मला वडिलांकडून नेहमीच ओरडा खावा लागत असे. ते मला बिनकामाचा माणूस म्हणत. तसेच मी जीवनात काहीच करू शकत नाही, असेही सांगत. पण मी राजकारणात आलो. पहिल्यांदाच निवडणूक लढवून खासदार झालो. मेहनत घेतल्यानेच मी यशस्वी झालो. तरी मी स्वत:ला एक भाग्यवान राजकारणी समजतो." असे त्यांनी सांगितले. शालेय जीवनात मी निष्काळजीपणे वागलो. पण आजच्या विद्यार्थ्यांनी असे वागून चालणार नाही. त्यांनी जबाबदारपणे वागले पाहिजे. तसेच मला भेटण्यासाठी विद्यार्थ्यांनी परवानगी घेण्याची गरज नाही. त्यांनी विधानसौधामध्ये येऊन कधीही मला भेटावे," असेही कुमारस्वामी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, शाळेत असताना होतो 'ढ', शेवटच्या बेंचवर बसायचो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 3:57 PM