बंगळुरु : जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकमधील काँग्रसचे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे. यावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. भाजप आणि जेडीएस आमचे सरकार पडण्याबाबत संभ्रमात आहेत, असे काँग्रसचे नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये मंत्री असलेला एक काँग्रेस नेता ५० ते ६० आमदारांसह लवकरच भाजपात प्रवेश करेल. कदाचित लवकरच कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोसळेल, काहीही घडू शकतं, असा दावा एच.डी. कुमारस्वामी यांनी केला होता. तसेच, कोणामध्येही प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठपणा राहिलेला नाही, असेही एच.डी. कुमारस्वामी म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, भाजप आणि जेडीएस यांची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे. त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नसून सत्तेसाविना त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
दुसरीकडे, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनीही एच.डी. कुमारस्वामी यांच्या विधानावर खरपूस समाचार घेतला आहे. निवडणुकीनंतर जेडीएसचं काहीही अस्तित्व उरलेलं नाही. अस्तित्व वाचवण्यासाठी कुमारस्वामी संघर्ष करीत आहेत. परंतु लोकसभेपूर्वीच भाजप आणि जेडीएसचे अस्तित्व उरणार नाही, असे प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे. दरम्यान, एच.डी. कुमारस्वामी यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कर्नाटक सरकारवर चर्चा रंगली आहे. तर, काँग्रेसही अलर्ट मोडवर असून याबाबच चाचपणी सुरू करेल, असे दिसून येते.