MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:24 PM2024-09-24T13:24:59+5:302024-09-24T13:25:46+5:30
MUDA Land Scam Case News: कथित MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या (Siddaramaiah) यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी राज्यपालांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांना स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
कथित MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना कर्नाटकउच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी राज्यपालांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांना स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. राज्यपालांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांना स्थगिती देण्याची मागणी करत सिद्धारामैय्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी याचिकेत नमूद केलेल्या बाबींची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आणि सिद्धारामैय्या यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
हे संपूर्ण प्रकरण एका ३.१४ एकर भूखंडाशी संबंधित आहे. हा भूखंड सिद्धारामैय्या यांची पत्नी पार्वती यांच्या नावे आहे. भाजपाकडून या प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि कर्नाटक सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. तसेच सिद्धारामैय्या यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी सिद्धारामैय्या यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.
दुसरीकडे सिद्धारामैय्या यांनी त्यांच्यावरील आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. तसेच आपल्याविरोधात तपासास परवानगी देण्याचे राज्यपालांचे आदेश हे बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. तसेच सिद्धारामैय्या यांनी राज्यपालांनी दिलेल्या आदेशांना कायदेशीर आव्हान देत कोर्टात धाव घेतली होती. राज्यपाल हे या सरकारला सहन करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून सरकारला सत्तेमधून हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा दावा केला आहे.