सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करण्यास बंदी; कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 05:34 PM2024-02-21T17:34:43+5:302024-02-21T17:38:42+5:30
कर्नाटक सरकारने बुधवारी राज्यभरातील हुक्का बारवर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले.
नवी दिल्ली: सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेत सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनावर बंदी घालण्याची घोषणा केली. तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने २१ फेब्रुवारी रोजी विधानसभेत COTPA कायद्यात (सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने) सुधारणा करून राज्यभरातील सर्व हुक्का बारवर बंदी घातली आहे.
याशिवाय २१ वर्षांखालील तरुणांना सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विकता येणार नाहीत, असा नियम लागू करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने बुधवारी राज्यभरातील हुक्का बारवर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक ते तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अधिसूचनेनुसार, राज्यातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि तंबाखूजन्य आजारांना आळा घालण्यासाठी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यात (COTPA) सुधारणा केल्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करण्यास बंदी
दरम्यान, तरूणाई व्यसनाच्या विळख्यात अडकू नये यासाठी २१ वर्षांखालील व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. सुधारित विधेयकात सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, धूम्रपानमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या वचनबद्धतेवर सरकारने भर दिला आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यास १ हजार रुपयांच्या दंडाचा समावेश आहे.